लातूर : प्रतिनिधी
नीट परीक्षेत पुन्हा एकदा लातूर पॅटर्नचा दबदबा पाहायला मिळाला. त्यातच नीट पेपरफुटीप्रकरणी चर्चेत आलेल्या लातूर येथील प्रा. शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी कोचिंग सेंटरनेही घवघवीत यश मिळविले. त्यामुळे क्लासमध्ये जल्लोष करण्यात आला. परंतु काही वेळातच या सेंटरवर सीबीआयचे पथक धडकले. हे पथक चौकशीसाठी दाखल झाल्याने खळबळ उडाली.
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची साखळी जोडण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे पथक पुन्हा एकदा लातूरमध्ये धडकले आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच सीबीआयचे ८ अधिका-यांचे पथक पुण्यातून लातूरमध्ये दाखल झाले. त्यामुळे कोचिंग क्लासमध्ये खळबळ उडाली. सीबीआयचे अधिकारी लातूरमधील नामांकित आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये दाखल झाले. या ठिकाणी ३ तासाहून अधिक काळ सीबीआयच्या पथकाकडून विविध कागदपत्रांची कसून पडताळणी करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे नीट परीक्षेच्या निकालानंतर आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये उत्तम निकालाचा जल्लोष करण्यात आला होता. हा जल्लोष संपताच काही वेळात सीबीआयचे पथक पोहोचल्याने खळबळ उडाली आहे.
नीट पेपरफुटीनंतर झालेल्या री नीट परीक्षेत आरसीसीमधील २,२०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ३६ विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक गुण मिळवले असून, ५३० पेक्षा जास्त गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे साडेपाचशेच्या घरात आहे. त्यानंतर कोचिंग क्लासच्या वतीने जल्लोष करण्यात आला.
















