निलंगा : प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत विकासाचे नवे उदाहरण निर्माण केले आहे. तर शेळगी ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक तर गुराळ तृतीय व तगरखेडा उत्तेजनार्थ मिळवून तालुक्यातील आदर्श गावांच्या यादीत आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. या यशामुळे दोन्ही गावांमध्ये आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतींचे मूल्यांकन स्वच्छता, पाणीपुरवठा, लोकसहभाग, डिजिटल प्रशासन, पर्यावरण संवर्धन तसेच शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह ग्रामीण विकासाच्या विविध निकषांवर करण्यात आले. या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आनंदवाडी आणि शेळगी तर तृतीय गुराळ व उत्तेजनार्थ तगरखेडा व ग्रामपंचायतींनी तालुकास्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली.
आनंदवाडी ग्रामपंचायतीने गेल्या अनेक वर्षांपासून विकासकामांमध्ये सातत्य राखले आहे. गावातील मूलभूत सुविधांचा विस्तार, स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि योजनांची पारदर्शक अंमलबजावणी यामुळे गावाला प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला. ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश असल्याची भावना गावक-यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, शेळगी ग्रामपंचायतीलाही द्वितीय क्रमांक मिळाल्याने गावातील विकासकामांची दखल घेतली जात आहे. विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह लोकसहभाग वाढविण्यावर भर देत ग्रामपंचायतीने मूलभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. ग्रामपंचायतीचे नेतृत्व आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शेळगीने हे उल्लेखनीय यश संपादन केले.
















