जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहर तसेच तालुक्यामध्ये अनेक भागात रात्री बारा वाजल्यापासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसल्या, यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता. जळकोट तालुक्यामध्ये सलग तीन दिवसापासून भाग बदलत पाऊस पडत आहे, हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस आहे. या पावसावरून लवकरच मान्सूनचे आगमन होणार याची चाहूल शेतक-यांना लागली आहे.
जळकोट शहरांमध्ये दि. ६ जून रोजी सकाळी सहाच्या दरम्यान जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या, जवळपास अर्धा तास हा पाऊस कोसळला. तसेच रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे हलक्या जमिनीमध्ये ब-याच ठिकाणी पाणी साचले होते. जून महिन्याच्या तीन तारखेपर्यंत कडक उन्हाळा होता. मात्र अचानक वातावरणामध्ये बदल झालेला आहे. सध्या पावसाळी वातावरण झालेली आहे. हा पाऊस मान्सूनचा नसला तरीही मान्सूनपूर्व पाऊस आहे. या पावसामुळे आता पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. यावर्षी खूप उन्हाळा असल्यामुळे तसेच ट्रॅक्टरला डिझेल मिळाले नसल्यामुळे यावर्षी शेतक-यांची शेती मशागतीची कामे मागे पडली आहेत. असाच पाऊस पडत राहिला तर पेरणीपूर्व मशागतीची कामे देखील खोळंबणार आहेत. या पावसामुळे मात्र तीव्र गर्मी पासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
















