नंदुरबार : संसाराचा गाडा ओढण्यासाठी पती-पत्नी महत्त्वाचे मानले जातात. कधीतरी दोघांमध्ये खटके उडणे साहजिक आहे. मात्र त्यातही रुसलेल्या पतीची किंवा पत्नीची माफी मागून नाते पूर्वीसारखे सुरळीत करणे ही देखील दोघांची जबाबदारी मानली जाते. मात्र धडगाव तालुक्यात रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला सासरकडची मंडळी परत पाठवत नसल्याच्या रागातून, एका जावयाने चक्क सासरवाडीच पेटवून दिली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ सासरवाडीच नाही, तर शेजा-याचे घरही या आगीत जळून खाक झाले आहे. ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडक्याचा पाटील पाडा येथील मिथुन पाडवी याचे लग्न कुंडल येथील मुलीशी झाले होते. मात्र वादामुळे मिथुन यांची पत्नी माहेरी राहत होती. काही दिवसांनी राग शांत झाल्यावर मिथुन पत्नीला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आले होते. मात्र मिथुन यांना त्यांच्या सास-यांनी मुलीला परत पाठवण्यास नकार दिला. सास-यांचा नकार ऐकून मिथुन यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
संतापलेल्या मिथुन यांनी पत्नीला माघारी पाठवत नसल्याने थेट सासरवाडी गाठून घराला आग लावून दिली. उन्हाचा तडाखा आणि वा-यामुळे ही आग शेजारी राहणा-या सुभाष वळवी यांच्या घरापर्यंतही पसरली. या भीषण आगीत दोन्ही कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात अन्नधान्य, कपडे आणि घराचे छप्पर जळून खाक झाले असून दोन्ही कुटुंबे आता उघड्यावर आली आहेत.
या घटनेनंतर जावई फरार झाला असून त्याच्या विरोधात सासूने दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

