Homeमहाराष्ट्ररितेश-जिनिलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबेसिडर; विलासरावांच्या आठवणींना दिला उजाळा.

रितेश-जिनिलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबेसिडर; विलासरावांच्या आठवणींना दिला उजाळा.

मुंबई: महाराष्ट्रात रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या वादावर आता अभिनेते आणि राज्याचे नवनिर्वाचित एसटी ब्रँड अँबेसिडर रितेश विलासराव देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असायलाच हवी,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करताना रितेश देशमुख म्हणाले, “महाराष्ट्रात राहताना आणि प्रवास करताना मराठी बोललीच पाहिजे. ज्याप्रमाणे आपण दुसऱ्या राज्यात गेल्यावर तिथली भाषा आत्मसात करतो, तसेच महाराष्ट्रात मराठीचे महत्त्व असायला हवे. त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे योग्य आहे.”

लालपरीशी जोडलेलं जिव्हाळ्याचं नातं
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची एसटी महामंडळाचे (ST) ब्रँड अँबेसिडर म्हणून पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना रितेश देशमुख भावूक झाले. त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.

“साहेब लातूर-पुणे असा प्रवास एसटीनेच करायचे. त्यांनी परिवहन खातेही सांभाळले होते. आजही बाभळगावच्या घरात त्यांचा एसटीच्या खिडकीत बसलेला एक फोटो आहे, जो आमच्या कुटुंबासाठी खूप मोलाचा आहे.”

“एसटी माझ्या आयुष्याचा भाग राहिली आहे. आज तिचाच ब्रँड अँबेसिडर होताना मला सार्थ अभिमान वाटत आहे.” प्रताप सरनाईक यांच्या ‘व्हिजन’चे कौतुक करताना रितेश यांनी एसटीच्या भविष्यातील बदलांवरही भाष्य केले. एसटी ताफ्यात आता मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असून, संपूर्ण सेवा प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प आहे. ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ मुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन रितेश यांनी यावेळी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR