नाशिक : प्रतिनिधी
भोंदू अशोक खरात प्रकरण उजेडात येण्यास सहा महिने पूर्ण होत असताना या सहा महिन्यांत राज्यात १०० हून अधिक भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात महिलांच्या शोषणासंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
राज्यात खळबळ उडवून देणा-या भोंदू अशोक खरात प्रकरणाला १७ सप्टेंबर रोजी सहा महिने पूर्ण होत आहेत. खरात प्रकरणानंतर महाराष्ट्र अंनिसने राज्यभर बुवाबाजी संघर्ष परिषदांचे आयोजन केले. त्यामुळे अशा बाबांविरोधात चर्चा होऊन पीडितांना पाठबळ मिळाले. काही ठिकाणी महिला स्वत: पुढे आल्या. कुठे अंनिसच्या प्रयत्नाने गुन्हे दाखल झाले, असे अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे आणि कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.
गुन्हे दाखल होणा-यांमध्ये सर्वच धर्मांतील बाबांचा समावेश आहे. फसवणूक होणा-यांमध्ये ग्रामीणप्रमाणेच शहरी भागातीलही महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. महिलांच्या शारीरिक शोषणासह आर्थिक लुटीच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. करणी-भानामती काढतो, अंगात आलेले भूत उतरवतो, अघोरी पूजा करतो, कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी, आजारपण यातून बाहेर काढतो, पैशांचा पाऊस पाडतो, असे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आणि त्या बाबांविरुद्ध तक्रारी देण्यास पुढे येऊ लागल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.
















