दुचाकीचा टायर आडकून झाला अपघात, अपघाताचे प्रमाण वाढले
निटूर : प्रतिनिधी
लातूर-जहीराबाद महामार्गावर निटूर येथील एच. पी. पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी ६ च्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात पप्पू नंदकर, रा. हालकी, ता. शिरूर अनंतपाळ आणि संतोष टाकळीकर, रा. दौंड, जि. पुणे या दोघांचा मृत्यू झाला. दोघे एम. एच. २४ बी. सी. ८२६५ क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होते.
संतोष टाकळीकर हे दौंड येथे पोलिस दलात ए.एस.आय. पदावर कार्यरत होते. ते सुटीवर हालकी येथे आले होते. काही कामानिमित्त ते पप्पू नंदकर यांच्यासोबत निलंग्यास गेले होते. निलंग्याहून हालकीकडे परतत असताना निटूरजवळ महामार्गावर पडलेल्या भेगांमध्ये दुचाकीचा टायर अडकला. त्यामुळे ताबा सुटून दुचाकी रस्त्यावर कोसळली. दरम्यान, घटनास्थळी पोलिस आणि स्थानिकांचा जमाव जमला होता. निटूरजवळ महामार्ग अनेक ठिकाणी फाटलेला आहे. या भागात यापूर्वीही बरेच अपघात झाले आहेत. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेचा तपास निटूर पोलिस चौकीचे बीट जमादार घाडगे हे करत आहेत.
ट्रकने मृतदेहांना नेले फरफटत
मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी वाहनाची सोय करीत असतानाच सायंकाळी साडेसात वाजता भरधाव वेगात आलेल्या उसाच्या ट्रकने मृतदेहांना धडक दिली. त्यामुळे या अपघातात मृतदेह फरफटत गेले. त्यानंतर ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका टेम्पोला आणि काही दुचाकींना धडक दिली. यात वाहनांचे नुकसान झाले. ट्रक जोरात येत असल्याचे पाहून जमावाने रस्त्याच्या कडेला धाव घेतली. त्यात काहींना काटे टोचून किरकोळ जखम झाली. ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने निटूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
















