जैशच्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अटकेत
कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील राजकीय नेते आणि व्हीआयपी व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये फसवून त्यांची संवेदनशील गुप्त माहिती गोळा करण्याचा एक अत्यंत मोठा कट स्पेशल टास्क फोर्सने उधळून लावला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित संशयित ऑपरेटर मोहम्मद हामिम मंडलच्या अटकेनंतर त्याच्या प्रेयसीला म्हणजेच अर्पिता सरकारला झारखंडच्या साहिबगंज येथून अटक करण्यात आली.
अर्पिता सरकारला साहिबगंज येथून ताब्यात घेऊन बंगालमधील बर्धमान येथे आणण्यात आले. या दोघांमध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून झालेला डिजिटल संवाद आणि चॅट एसटीएफने जप्त केले असून, त्यांच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू आहे. दरम्यान, अर्पिता सरकारला १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
विशेष पथकाने ३० जुलै रोजी बर्धमान शहरातील एका गृहनिर्माण संस्थेतील भाड्याच्या अपार्टमेंटमधून मोहम्मद हामिम मंडलला बेड्या ठोकल्या होत्या. मंडल हा आयएसआय समर्थित दहशतवादी नेटवर्कचा भाग असल्याचा संशय आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांसह इतर प्रमुख राजकीय व्यक्तींची वैयक्तिक माहिती गोळा करणे, नवीन ऑपरेटिव्हची भरती करणे आणि संभाव्य दहशतवादी कारवायांसाठी पाया तयार करणे, हे काम त्याच्यावर सोपवण्यात आले होते.
जाळ््यात ओढण्यासाठी
केला महिलेचा वापर
आरोपीने अनेक राजकीय नेत्यांची संवेदनशील व खासगी माहिती मिळवण्यासाठी एक विस्तृत जाळे तयार केले होते. या नेटवर्कमध्ये अर्पिता सरकारचा वापर नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी केला जात होता. जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिस या हनी ट्रॅप नेटवर्कचा कसून तपास करत आहेत
















