शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ तालुक्यात सोमवारी झालेल्या दमदार पावसाने संपूर्ण तालुका ओलाचिंब झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण असताना दुपारनंतर पावसाने जोरदार बॅटिंग केली. तालुक्यातील अनेक भागांत चांगला पाऊस झाल्याने शेतशिवारात पाणी साचले असून नाले-ओढेही वाहू लागले. या पावसामुळे खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आता सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस आदी पिकांच्या पेरणीला वेग देणार आहेत. मागील काही दिवसांपासून पावसाअभावी रखडलेल्या शेतीच्या कामांना आता गती मिळणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले.
दमदार पावसामुळे विहिरी, शेततळी आणि लहान बंधा-यांमध्येही पाण्याची आवक वाढली आहे. काही सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना किरकोळ गैरसोयीचा सामना करावा लागला मात्र पिकांसाठी हा पाऊस अत्यंत लाभदायक ठरणार असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी या पावसाचे समाधानाने स्वागत केले. तालुक्यात आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत असून, खरीप हंगामाला यामुळे चांगली सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे
















