लातूर : प्रतिनिधी
बचत गटातील महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाईल. बँकांकडून बचत गटांना गरजेनुसार जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड म्हणाले.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) लातूर जिल्हा कार्यालय अंतर्गत स्थापित एकता लोकसंचालित साधन केंद्र, लातूर (पश्चिम) ची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ जुलै रोजी भक्ती शक्ती मंगल कार्यालय येथे पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वार्षिक आढावा व नियोजन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
महिलांनी कर्जाचा वापर उद्योग-व्यवसायासाठी करून विहित वेळेत परतफेड करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले की, बचत गटातील महिलांची बँक कर्जाची परतफेड ९९.९५ टक्के इतकी असल्याबद्दल त्यांनी महिलांचे कौतुक केले. तसेच लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) महिला विकासासाठी चांगले काम करत असल्याचे सांगत, मशरूम व्यवसाय व रेशीम लागवड यांसारख्या शेतीपूरक व शेतीवर आधारित व्यवसायांकडे महिलांनी वळावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात संयुक्त मालकी हक्काबाबत सुमती बिडवे व त्यांच्या टीमने आणि कौटुंबिक हिंसाचाराबाबत बबन हटकर यांनी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे यांनी केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी सीएमआरसीच्या अध्यक्षा अश्विनी पडिले होत्या, तर सचिव मंगल भालेराव, जयहिंद सीएमआरसीच्या व्यवस्थापक सविता पाटील, सावित्रीबाई फुले सीएमआरसीच्या व्यवस्थापक उषा डूमने, एचडीएफसीचे भरत काळे आणि कार्यकारिणीचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल वाघचौरे व विजयकुमार स्वामी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील श्रीगीरी, अनंत हेरकर, प्रवीण जगताप, सतीश गीते व एकता सीएमआरसीच्या टीमने परिश्रम घेतले. व्यवस्थापक सुजाता तोंडारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
















