भारतीय बॉक्सर चमकले, अॅथलिटस्कडून निराशा
ग्लासगो : वृत्तसंस्था
ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने शानदार प्रदर्शन करीत एकूण ३९ पदकांची लयलूट केली. या स्पर्धेत ख-या अर्थाने भारतीय बॉक्सरनी कमाल केली. भारतीय बॉक्सरनी एकूण १० पदके जिंकली असून, त्यापैकी ७ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. अखेरच्या दिवशी आज भारतीय अॅथलिटस् काही तरी कमाल करतील आणि पदकांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु भारतीय अॅथलिटस्नी निराशा केली.
राष्ट्रकुल स्पर्धेत आज अखेरच्या दिवशी भारतीय अॅथलिटस्ना देशासाठी काही तरी करून दाखविण्याची संधी होती. भारताच्या पदक तालिकेत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु भारतीय अॅथलिटस् या स्पर्धेत अपयशी ठरले. त्यामुळे भारताला ३९ पदकांच्या वर मजल मारता आली नाही. त्यामुळे या राष्ट्रकुल स्पर्धेत भारत सर्वाधिक पदके जिंकणा-या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर राहिला.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य अशी ३९ पदके पटकावली.भारतापुढे आता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा हे ३ देश आहेत. या यशात सर्वात मोठा वाटा भारतीय बॉक्सरचा आहे. कारण भारताचे १० बॉक्सर अंतिम फेरीत दाखल झाले आणि त्यातील ७ जणांनी सुवर्ण पदकाची कमाई केली तर ३ जणांनी रौप्य पदक जिंकत इतिहास घडविला.
२०१० मध्ये सर्वोत्तम कामगिरी
राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारताने सर्वाधिक पदके २०१० च्या स्पर्धेत जिंकली होती. ही स्पर्धा राजधानी दिल्लीत झाली होती. त्यावेळी भारतीय अॅथलिटस्नी घरच्या मैदानात १०१ पदकांची लयलूट केली होती. त्यामुळे ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ कांस्य पदके जिंकली होती. भारताचे हे सर्वोत्तम प्रदर्शन राहिलेले आहे.
२०१४, १८ मध्येही बजावली उत्तम कामगिरी
२०१८ मध्ये गोल्ड कोस्टमध्ये आयोजित स्पर्धेतही भारताने ६६ पदके जिंकली होती. यात २६ सुवर्ण होती. याशिवाय २० रौप्य आणि २० कांस्य पदके पटकावली होती. तत्पूर्वी २०१४ मध्येही ग्लासगोत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ६४ पदकांची कमाई केली होती. त्यामध्ये १५ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्य पदके पटकावली होती.
















