२ एलपीजी टँकर्सना जाण्यास परवानगी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे संपूर्ण जगात इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी खनिज तेलाची वाहतूक रोखून धरल्याने संपूर्ण जग संकटात आहे. पश्चिम आशियात तणाव वाढलेला असताना इराणने भारताला होर्मुझ सामुद्रधुनीतून दोन एलपीजी टँकर नेण्याची परवानगी दिली आहे. इराणच्या भारतातील राजदूतांनी यासंबंधी वक्तव्य केल्यानंतर काही तासांमध्ये हा निर्णय झाला. त्यामुळे भारताला दिलासा मिळाला आहे.
सागरी वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना भारतासोबत इराणचे संबंध अतूट आहेत. या मैत्रीचा परिणाम पुढच्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण जगाला दिसणार आहे, असे इराणचे भारतातील राजदूत मोहमद फथाली यांनी म्हटले होते. त्यानंतर काही तासांतच दोन भारतीय एलपीजी टँकर्सना होर्मुझ सामुद्रध्वनीतून जाण्यास परवानगी दिली. त्यामुळे भारतातील गॅस पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. आखाती देशांमधून निघणारी जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून जातात. या मार्गावरून जाणा-या जहाजांवर इराणने हल्ले सुरु केले आहेत. त्यामुळे जगाची चिंता वाढलेली असताना इराणकडून भारताला दिलासा मिळाला आहे.
पत्रकारांशी दिल्लीत संवाद साधताना फथाली यांनी होर्मुझमधील वाहतुकीवरुन इराणची भूमिका स्पष्ट केली. भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग दिला जाणार का, असा प्रश्न फथाली यांना विचारण्यात आला. भारत आमचा मित्र आहे. या दिशेने लवकरच सकारात्मक परिस्थिती पाहायला मिळू शकते, असे उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर काही तासांतच दोन भारतीय टँकर्सना होर्मुझ सामुद्रध्वनीतून जाण्यास इराणने परवानगी दिली.
रशिया आता गॅस
पुरवठ्यास तयार
जगात तेलासोबतच गॅस पुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे. अशा स्थितीत रशिया भारतासाठी संकटमोचक ठरू शकतो. रशियाने भारताला एलएनजी गॅस पुरवठा करण्यास तयार आहे, असे म्हटले आहे. भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी रशिया भारताला एलएनजी पुरवठ्यास तयार आहे, असे म्हटले. निर्बंधांच्या कारणाने मागील करारामध्ये अडचण आली होती, असेही ते म्हणाले. त्यामुळे रशिया भारतासाठी संकटमोचक ठरू शकतो.

