छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
भाजप पुढच्या वेळी पुन्हा सत्ता पाहू शकणार नाही, असा मोठा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून आज, गुरुवारी ( दि. १७) आयोजित ‘तुमसे ना हो पाएगा’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना थेट आर्थिक मदत देण्याची आग्रही मागणी केली, तसेच सत्ताधा-यांवर चौफेर टीकास्त्र डागले.
१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती असल्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, मराठवाड्यातील मोठमोठे होर्डिंग्ज पाहून सर्वकाही आलबेल असल्याचे भासवले जात आहे; पण प्रत्यक्षात मराठवाडा तीव्र दुष्काळाच्या छायेत आहे. मुक्तिसंग्राम दिनाला उपस्थित न राहता स्वत:च स्वत:ला पुरस्कार खरेदी करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरात दौ-यावर गेले. येथील शेतक-यांच्या व्यथा आणि वेदना त्यांना कधीच कळणार नाहीत.
मराठवाड्यातील सत्ताधारी आमदारांवर तोफ डागत ठाकरे म्हणाले, मराठवाड्याच्या व्यथा पंतप्रधानांसमोर मांडण्याची हिंमत येथील एकाही लोकप्रतिनिधीत नाही. हैदराबाद मुक्तीसाठी सरदार वल्लभभाई पटेलांनी फौजा उतरवल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी फौजा पाठवणा-या या सरकारमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य घुसवण्याची हिंमत आहे का?
५ ऑक्टोबरनंतर शिवसैनिक पीक पंचनामे तपासणार
शेतक-यांच्या मदतीबाबत बोलताना ठाकरे यांनी शिवसैनिकांना थेट मैदानात उतरण्याचे आदेश दिले. राज्य सरकार ५ ऑक्टोबरपासून पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करणार आहे. आपल्या शिवसैनिकांनी प्रत्येक गावात प्रत्यक्ष हजर राहून पंचनामे योग्य पद्धतीने होतात की नाही हे तपासावे. एकाही शेतक-याची फसवणूक होणार नाही आणि सर्वांना मदत मिळेल, याची खात्री करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जातीपातीचे विष कालवून सत्ता उपभोगत आहेत
भाजपवर तीव्र हल्ला चढवत उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप ही केवळ सत्तेची पिपासू आहे. त्यांनी देशात हिंदू-मुस्लिम वाद पेटवले आणि महाराष्ट्रात जाती-जातीत संघर्ष उभा केला. मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर, कुणबी, आदिवासी अशा सर्व घटकांना एकमेकांसमोर उभे केले जात आहे. एकीकडे मनोज जरांगे स्वत:चे प्राण पणाला लावून लढत आहेत आणि दुसरीकडे सत्ताधारी मलिदा लाटत आहेत.
















