माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला विश्वास
लातूर : प्रतिनिधी
लातूर, धाराशिव, बीड या विधान परिषदेच्या मतदारसंघात शेतक-यांचे तसेच तरुणांचे प्रतिनिधी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख इतिहास रचतील, असा विश्वास माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
लातूर, धाराशिव, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्या प्रचारार्थ दि. ६ जून रोजी लातूर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे, काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्ह्याचे प्रभारी जितेंद्र देहाडे, धाराशिवचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, जिल्हा परिषद सदस्या आशाताई भिसे, लातूर मनपातील सभागृह नेते विजयकुमार साबदे, लातूर मनपाच्या स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, तानाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रात निवडणुकाच होऊ नयेत, अशी सत्ताधा-यांची सध्याची स्थिती आहे, असे नमूद करून माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी सत्ताधारी साम, दाम, दंड आणि भेद या सर्वच गोष्टींचा अवलंब करीत आहेत. अशा गलिच्छ वातावरणातही महेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. ते मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने निवडणुक लढत आहेत. खरे तर सत्ताधा-यांच्या विरोधात निवडणूक लढणे खूप जिकिरीचे झाले आहे. लोकशाही सक्षम करावयाची असेल तर विधान परिषद एक उत्तम माध्यम आहे. महेश देशमुख यांना काँग्रेस महाविकास आघाडीने संधी दिली आहे. ते मतदारसंघातील प्रश्नांवर आग्रही राहून या मतदारसंघाला न्याय मिळवून देतील यात शंका नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधा-यांकडून प्रचंड प्रमाणात पैशांचा वापर केला जात आहे. पैशांच्या जोरावर निवडणूक बिनविरोध काढण्याचा सत्ताा-यांचा मनसुबा महेश देशमुख यांनी उधळून लावला. मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांना प्रचंड मतांनी निवडून देतील, असा विश्वास व्यक्त केला. उमेदवार महेश देशमुख म्हणाले, शेतकरी, युवक आणि राजकारण या तीन मुद्यांवर देशाची जडणघडण होत असते. परंतु सध्या सत्ताधा-यांनी शेतक-यांची अवस्था बिकट केली आहे. लाखो युवक बेरोजगार आहेत आणि राजकारण तर गलिच्छ पातळीवर आणले आहे. मतदारांनी मला संधी द्यावी, मतदारसंघातील सर्वच प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असे सांगितले. यावेळी राहुल सोनवणे, उमेशराजे निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
















