लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ खुर्द येथील गावातल्या मुख्य रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिकांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरअर्धनग्न आंदोलन केले. हरंगुळ खुर्दच्या मुख्य रस्त्याची अवस्था रस्त्यात खड्डे की खड्ड्यांचा रस्ता अशी झाली आहे. पावसाळ्यात तर या खड्ड्यांत पाणी साचून अनेक अपघात होत आहेत.
या रस्त्याचे उद्घाटनदेखील झाले. मात्र, बांधकाम विभागाच्या ढिम्म आणि उदासीन कारभारामुळे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, वेळोवेळी निवेदने दिली, मात्र त्याची दाखल घेतली जात नाही. त्यामुळे गावातील संतापलेल्या युवकांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच चक्क अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यानंतरही प्रशासनाला जाग नाही आल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
















