मनोभावे लक्ष्मीचे पूजन, फटाक्यांची आतषबाजी
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट असले तरी सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी होत असून, आज लक्ष्मी पूजन असल्याने उत्साह, पारंपरिक आनंदाची उधळण आणि सर्वत्र रोषणाईचा झगमगाट पाहायला मिळाला. लक्ष्मी पूजनामुळे दिव्यांच्या प्रकाशमय झगमगाटात सर्व शहरे उजळून निघाले. या निमित्ताने व्यापारी, उद्योजक, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी माता लक्ष्मीचे भक्तिभावाने पूजन करण्यात आले. तसेच घरोघरीही लक्ष्मी पूजन केले आणि फटाक्यांची आतषबाजी आणि दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा केला.
संध्याकाळच्या शुभ मुहुर्तावर व्यापारी, दुकानदारांनी पारंपरिक पद्धतीने चोपडा आणि दप्तर पूजन केले. यासोबतच संगणक, गल्ल्याचेही पूजन करीत आगामी वर्ष भरभराटीचे जावो, अशी प्रार्थना लक्ष्मीच्या समोर करण्यात आली. लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने घर, दुकानांच्या समोर लक्षवेधी रांगोळ््या काढण्यात आल्या. तसेच दुकानांना झेंडूच्या फुलांचे तोरण, आंब्यांची पाने, केळीचे खूंट लावून सजावट करण्यात आली होती. सुरेख रांगोळ््या आणि रोषणाईने घरांसोबतच बाजारपेठा उजळून निघाल्या. रात्री लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज्यात सर्वत्र असेच चित्र पाहायला मिळाले.
मुंबईसह पुण्यात आणि राज्यात सर्वत्र घराघरांत व बाजारपेठांमध्ये लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्यात आली. लहान मुलांनी फटाक्यांची आतषबाजी केली तर व्यापा-यांनी दुकानांत आणि कार्यालयांत वहीखात्याचे पूजन केले. लक्ष्मी पूजनानिमित्त सकाळपासूनच बाजारपेठा फुलल्या होत्या. ग्राहकांनीही सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे दिवसभर सर्वत्र बाजारपेठांत गर्दी पाहायला मिळाली.
















