मुंबई : प्रतिनिधी
गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजासह इतर मंडळांमध्ये भक्तांची प्रचंड गर्दी होत असल्याचा फायदा चोरटे घेत आहेत. १४ सप्टेंबर रोजी लालबाग परिसरातील दर्शनाच्या रांगेत चोरट्यांनी भाविकांना लक्ष्य करत सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम लांबवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील दोन जणांना बेड्या ठोकल्या असून भाविकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० च्या सुमारास मालाड येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे मायकल बब्लू नाडर (वय, २८) दर्शनाच्या रांगेत उभे होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या खिशातील २५,००० रुपयांचा मोबाईल आणि २,३०० रुपयांची रोख रक्कमेची चोरी केली. चोरी झाल्याचे लक्षात येताच नाडर यांनी आरडाओरडा केला.
पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन्ही संशयितांना भाविकांनी पाठलाग करून पकडले आणि चांगलाच चोप दिला. दरम्यान, साध्या वेशात गस्त घालणा-या कालाचौकी पोलिसांच्या पथकाने मध्यस्थी करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. आरिफ सॅमसनसिंग गुर्जर (वय, २४) आणि सोमनाथ समनसिंग राठोड (वय, २३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
















