लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणी आणि मतदार यादी विशेष पडताळणी मोहिमेला(एसआयआर) मोठी गती दिली आहे. याच अनुषंगाने, लातूर शहर व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ जुलै रोजी येथील काँग्रेस भवनमध्ये ८ वी महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव रेहाना चिश्ती यांनी लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन केले.
अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव रेहाना चिश्ती आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सदरील बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रेहाना चिश्ती यांनी आपल्या आक्रमक शैलीत उपस्थितांमध्ये नवा उत्साह निर्माण केला. देशातील सद्य:स्थितीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, आज देशातील लोकशाही आणि संविधान मोठे आव्हान पेलत आहे. सर्वसामान्यांचे आणि कष्टक-यांचे प्रश्न सोडवण्या ऐवजी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अशा या कठीण काळात काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने खंबीरपणे रस्त्यावर उतरणे ही काळाची गरज आहे. ‘एसआयआर’ मोहिमेचे अनन्यसाधारण महत्त्व सांगताना त्यांनी पदाधिका-यांना मोलाचा कानमंत्र दिला.
आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील ‘कॅन्डल मार्च’चे कौतुक
या बैठकीत मार्गदर्शन करताना रेहाना चिश्ती यांनी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये नुकत्याच काढण्यात आलेल्या भव्य कॅन्डल मार्चचा विशेष उल्लेख केला. त्या म्हणाल्या, लातूरमध्ये नुकताच झालेला हा कॅन्डल मार्च अत्यंत यशस्वी ठरला. यातून जनतेचा काँग्रेस पक्षावरील विश्वास आणि आमदार अमित देशमुख यांच्या खंबीर नेतृत्वाची प्रचिती येते. या शानदार आणि यशस्वी नियोजनाबद्दल मी आमदार अमित देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करते. या मार्चमुळे लातूर शहरातील कार्यकर्त्यांमध्ये एक मोठी ऊर्जा निर्माण झाल्याचे आणि जनतेमध्ये एक सकारात्मक संदेश गेल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत रुजवावा
या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व लातूर जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख म्हणाले, काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्यांचा, शेतकरी आणि कष्टक-यांचा पक्ष राहिला आहे. आज राज्यामध्ये आणि देशामध्ये जे द्वेषाचे आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, त्याला केवळ काँग्रेसचा सर्वसमावेशक विचारच चोख उत्तर देऊ शकतो. त्यासाठी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे. प्रास्ताविकात शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले डॉ. दिनेश नवगिरे यांच्याकडून एसआयआर मोहिमेचा सविस्तर आढावा
या बैठकीत संघटनात्मक कार्याचा आणि एसआयआर मोहिमेचा आढावा घेण्यात आला.
सूत्रसंचालन मोईन सय्यद यांनी तर आभार प्रा. प्रवीण कांबळे यांनी मानले. बैठकीस अमर खानापुरे, श्रीशैल उटगे, अॅड. समद पटेल, विद्याताई पाटील, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, महापालिकेचे सभागृहनेते विजयकुमार साबदे, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई भिसे, डॉ. स्मिता शहापूरकर, एकनाथ पाटील, फैसलखान कायमखानी, प्रवीण सूर्यवंशी, अनिल चव्हाण, अॅड, देविदास बोरुळे, गिरीश ब्याळे, सतीश साळुंके, रोहित बिराजदार, सुपर्ण जगताप, सिराज शेख, अस्लम चाऊस, सतीश हलवाई, अविनाश बट्टेवार, पवनकुमार गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, भालचंद्र येडवे, नबी नळेगावकर, विजय टाकेकर, राजाभाऊ गायकवाड, पवन बनसोडे, संदीपान सूर्यवंशी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















