लातूर : प्रतिनिधी
एल-निनोच्या प्रभावामुळे यंदाचा जुन महिना पावसाविना जातो की, काय अशी परिस्थिती असतानाच जूनच्या शेवटच्या चार-पाच दिवसात लातूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. लातूर शहर व परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत होता. रविवारी मात्र चांगल्या पावसाला सुरुवात झाली.
लातूर शहरासह जिल्हाभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली होती त्यानंतर शनिवारी पावसाने उघडीप दिली होती तर रविवारी सकाळपासून कडक ऊन होते. मात्र दुपारी अचानक हवामानात बदल होऊन ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. मृग नक्षत्रानंतर आर्द्रा नक्षत्र देखील संपत आले आणि रविवाी पहिल्यांदाच मोठा पाऊस झाल्यामुळे शेतक-याच्या चेह-यावर आनंद पसरला असून लवकरच खरीपाच्या पेरण्या सुरु होतील, असा अंदाज वर्तवलाजात आहे.
















