छत्रपती संभाजीनगर : शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. त्यांनी सांगितले तो आमच्यासाठी आदेश असतो. शिवसेनेतील सहा आमदार आणि एक खासदार असे आम्ही सर्वांमध्ये समन्वय राहावा, कोणताही परस्पर वाद होऊ नये असे शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आमच्यातील सर्व वाद संपले असून भविष्यात एकजुटीने, एकदिलाने काम होईल असा विश्वास पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
शुक्रवारी जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीतर्फे शिवसेनेकडून विलास भुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री शिरसाट आणि आमदार सत्तार हे एकाच वाहनातून बँकेत दाखल झाले. यावेळी, पालकमंत्री शिरसाट, सत्तार, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे उपस्थित होते.
सत्तार म्हणाले, अनेक महिन्यांनंतर मला पालकमंत्र्यांच्या गाडीत बसण्याची संधी मिळाली आहे. माझे आणि शिरसाट यांच्यातील वाद आता मिटले आहेत. पक्षाचे आम्ही सर्व सहा आमदार आणि एक खासदार असे सर्वजण पालकमंत्र्यांच्या सोबत आहोत. तर पालकमंत्री शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एक राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकजुटीने विकासासाठी काम करायचे आहे. पक्ष वाढवायचा आहे. परस्पर कोणताही वाद व्हायला नको. याचा परिणाम म्हणून सत्तार आज माझ्या गाडीतून आल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले.
मतभेदांच्या रंगल्या होत्या चांगल्याच चर्चा
पालकमंत्री व सत्तार यांच्यातील शीतयुद्ध मागे चांगलेच चर्चेत होते. अनेक मुद्यांवर दोघांचे मतभेद होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकाच गाडीतून प्रवास करताना दिसून आले. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद दूर झाल्याचे संकेत मानले जात आहे. यात पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची मध्यस्थी महत्त्वाची मानली जात आहे.
















