अहमदपूर : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तालुका विद्यूत वितरण कंपनीवर शिवसेनेने धडक मोर्चा काढला. अहमदपूर शहरासह तालुक्यातील विद्यूत पुरवठा पाच ते दहा मिनिटा नंतर सारखा का खंडीत होत आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त होत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असून अंगाची लाही लाही होत असून अंगातून सतत घामाच्या धारा येत आहेत, असा जाब मोर्चेकरांनी विचारला.
या बाबतीत विचारणा करण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, तालुका संघटक अनिकेत फुलारी, नगरसेवक तथा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सभापती प्रतिक रेड्डी, शहर प्रमुख शिवा कासले, बालाजी काळे, उपशहरप्रमुख शिवा भारती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक माऊली देवकत्ते, सर्कल प्रमुख भगवान कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विद्यूत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली असता येथील प्रमुख अधिकारी गैरहजर होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख भारत सांगवीकर यांनी तात्काळ पाटील यांना दुरध्वनीवर संपर्क साधून तालुक्यातील सध्याची परिस्थिती मांडली. शेतक-यांना पिकाला पाणी देता येत नाही, ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, जनावरांना पाणी मिळत नाही, शेतक-यांना मशागतीसाठी साहित्य मिळत नाही, उष्णतेच्या त्रासापासून नागरीकांना सुटका मिळत नाही, शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरळीत नाही.
















