लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्गांवर १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्तीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी कमी करण्याच्या उद्देशाने लातूर पोलीस विभागाने या उपक्रमाला विशेष महत्त्व दिले असून, दंडात्मक कारवाईसोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही भर देण्यात येत आहे. हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी पोलीस दलातर्फे हेल्मेटधारक दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीपूर्वीच लातूर पोलीस विभागाकडून विविध माध्यमांतून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. हेल्मेट वापरणे ही केवळ कायदेशीर बाब नसून स्वत:चे आणि कुटुंबाचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठीची जबाबदारी आहे, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. या उपक्रमाचा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडून दररोज आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी व अंमलदारांना हेल्मेट सक्तीचे महत्त्व समजावून सांगत नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक दुचाकीस्वाराने शंभर टक्के हेल्मेट वापरावे, यासाठी पोलीस विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी या उपक्रमाला मानवी आणि सकारात्मक स्वरूप देण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्यासह औसा हायवे रोडवर प्रत्यक्ष उपस्थित राहून हेल्मेट परिधान करून वाहन चालविणा-या दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले. हेल्मेट वापरणा-या चालकांना अशाच पद्धतीने नियमितपणे हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच हेल्मेट न वापरणा-या दुचाकीस्वारांशी संवाद साधून हेल्मेटचे महत्त्व, अपघाताच्या वेळी होणारी जीवितहानी आणि हेल्मेटमुळे डोक्याला होणा-या गंभीर दुखापतीपासून मिळणारे संरक्षण याबाबत माहिती देण्यात आली. प्रत्येक दुचाकीस्वाराने पुढील प्रवासापासून नियमितपणे हेल्मेट वापरावे, असे आवाहन करण्यात आले.
हेल्मेट सक्तीच्या उपक्रमाला जिल्हाभरातून प्रतिसाद मिळावा यासाठी पोलीस अधिकारी स्वत: रस्त्यावर उतरून नागरिकांना आवाहन करत आहेत. चाकूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मायने तसेच निलंगा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल दुमे यांनीही रस्त्यावर प्रत्यक्ष उपस्थित राहून दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन केले.
















