तेहरान : वृत्तसंस्था
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्ने अमेरिकेला थेट युद्धाचा इशारा दिला आहे. आमच्या तेलवाहू जहाजांना किंवा व्यापारी जहाजांना धक्का लागल्यास या भागातील अमेरिकन लष्करी तळ आणि युद्धनौका उद्ध्वस्त करू, अशी आक्रमक भूमिका इराणने घेतली आहे
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने अमेरिकेला पुन्हा एकदा गंभीर इशार दिला आहे. त्यांच्या तेलवाहू जहाजांवर किंवा व्यापारी जहाजांवर कोणताही हल्ला झाल्यास, या प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांवर आणि जहाजांवर हल्ले करून जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे आयआरजीसीने म्हटले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ तणाव कायम असताना हा इशारा देण्यात आला आहे.
सरकारी वृत्तसंस्था आयआयबी न्यूजने म्हटले आहे की, इराणी तेलवाहू जहाजांवर आणि व्यापारी जहाजांवर झालेल्या कोणत्याही हल्ल्याला या प्रदेशातील अमेरिकन तळांपैकी एकावर आणि शत्रूच्या जहाजांवर व्यापक हल्ल्याच्या स्वरूपात प्रत्युत्तर दिले जाईल.
इराण आणि अमेरिकन सैन्यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जवळपासच्या प्रदेशात झालेल्या काही चकमकींनंतर हा इशारा देण्यात आला आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, शुक्रवारी इराणी सैन्य आणि अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजांमध्ये संघर्ष झाला. त्यानंतर परिस्थिती निवळल्याचे सांगण्यात आले असले तरी अशा प्रकारचा संघर्ष पुन्हा होण्याची भीती आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम अजूनही लागू असल्याचे सांगितले आहे.
आयआरआयबीने स्वतंत्रपणे प्रसारित केलेल्या दुस-या एका निवेदनात, एका वरिष्ठ इराणी कमांडरने इराणचे लष्कर सज्ज असल्याचे म्हटले आहे.
या प्रदेशातील अमेरिकन लक्ष्यांवर आणि आक्रमण करणा-या शत्रूच्या जहाजांवर आयआरजीसीची क्षेपणास्त्रे आणि एरोस्पेस ड्रोन्स रोखले गेले आहेत, असे जनरल सरदार मौसवी म्हणाले. आम्ही फक्त गोळीबार करण्याच्या आदेशाची वाट पाहत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेच्या प्रस्तावाचा इराणकडून आढावा
इराणी अधिका-यांनी सांगितले की, ते अमेरिकेकडून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाचा आढावा घेत आहेत. असे असले तरी त्यांनी ताज्या घडामोडींमुळे याबाबत अविश्वास व्यक्त केला. अली सफारी म्हणाले की, इराणला राजनैतिक माध्यमांतून असा मेसेज मिळाला आहे की अमेरिकेला हा संघर्ष अधिक वाढवायचा नाही.

