Homeसंपादकीय...वेळ आली नव्हती!

…वेळ आली नव्हती!

एखाद्या घटनेतून बचावले की, ‘काळ आला होता; परंतु वेळ आली नव्हती’ असे म्हटले जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत असे तिस-यांदा घडले आहे. वॉशिंग्टनमध्ये वार्षिक व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डन्ट डिनर दरम्यान झालेल्या गोळीबारातून डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्रपती जेडी व्हान्स बालंबाल बचावले आहेत. संशयित हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचे नाव कोल टॉमस अ‍ॅलन आहे. तो कॅलिफोर्नियातील टॉरन्स येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. हिल्टन हॉटेलमध्ये शनिवारी हा प्रकार घडला. गोळीबार झाल्यानंतर ट्रम्प आणि मेलानिया यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. ट्रम्प यांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना हल्लेखोर त्यांच्या इतक्या जवळ पोहोचू कसा शकला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. व्हाईट हाऊसमध्ये वार्तांकन करणा-या वार्ताहर संघटनेसाठी मेजवानीचा हा कार्यक्रम दरवर्षी होतो त्यात अमेरिकेचे अध्यक्ष सहभागी होऊन भाषण करतात. शनिवारच्या कार्यक्रमाला ट्रम्प, त्यांच्या पत्नी, उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स आणि ट्रम्प सरकारमधील महत्त्वाचे चेहरे उपस्थित होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना गोळीबाराचा आवाज झाल्याने पळापळ झाली. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ ट्रम्प यांना सुखरुप बाहेर काढले.

बंदुकधारी सुरक्षारक्षकांनी ट्रम्प यांच्या दिशेने धाव घेतली. गोळीबारानंतर अनेक लोक जीव वाचवण्यासाठी टेबलाखाली लपले. या हल्ल्याबाबत ट्रम्प म्हणाले, हा कार्यक्रम अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित होता. सर्वांना एकत्र आणणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाआधी सुरक्षेच्या धोक्याबाबत आमच्या टीमकडे कोणतीही माहिती नव्हती. कार्यक्रम सुरू असताना एका व्यक्तीने सुरक्षारक्षकावर हल्ला केला; परंतु त्याने बुलेटप्रुफ जॅकेट घातले होते त्यामुळे त्याचा जीव वाचला. डिनरला सुमारे २६०० पाहुणे उपस्थित होते. हल्ल्यामागचा उद्देश स्पष्ट झाला नाही, तपास सुरू आहे. हॉटेलमध्ये दोन गन आणि काडतुसे घेऊन हल्लेखोर शिरला होता त्याला ट्रम्प यांचे मंत्रिमंडळ संपवायचे होते. ट्रम्प यांचे सात स्तरीय सुरक्षा कवच तोडून हल्लेखोर ट्रम्प यांच्याजवळ पोहोचला होता. त्याने ७ गोळ्याही झाडल्या होत्या. तो आणखी पुढे येण्यापूर्वीच सुरक्षारक्षकांनी त्याच्यावर झडप घातली. या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर काही मिनिटात ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही अशा हल्ल्यांना घाबरत नाही हे त्यांना दाखवायचे होते. ट्रम्प म्हणाले, हा अमेरिकेच्या संविधानावरील हल्ला आहे. सुरक्षारक्षकांनी चांगले काम केल्याने बचावलो; पण इराणने हा हल्ला घडवला असेल असे वाटत नाही.

ट्रम्प यांच्यावरील गत १० वर्षातील हा नववा हल्ला असल्याचे सांगितले जाते. १९८१ साली याच हिल्टन हॉटेलमध्ये रेनॉल्ड रिगन यांच्यावर हल्ला झाला होता. हिल्टन हॉटेलमध्ये ट्रम्पवर हल्ला करणारा ३१ वर्षाचा तरुण शिक्षक व व्हीडीओ गेम डेव्हलपर आहे. त्याने मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली असून त्याने संगणकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आहे. २०१४ मध्ये त्याने नासाच्या ‘जेट प्रोपल्शन लेबोरेटरी’मध्ये फेलो म्हणून काम केले आहे. लॉस एंजलीस येथील काऊंटीत त्याला उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कारही मिळाला आहे. तो डेमॉक्रॅट पक्षाचा कार्यकर्ता आहे. २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या विरोधात निवडणूक लढणा-या कमला हॅरिस यांना त्याने २५ डॉलरची देणगीही दिली होती त्यामुळे या हल्ल्याला राजकीय रंगही चढला आहे. हल्लेखोर कोलने हा हल्ला का केला? त्याचा उद्देश काय होता? याचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार कोल हा आधीपासूनच हिल्टन हॉटेलमध्ये उतरला होता. तो सुरक्षा नसलेल्या एका खोलीतून बॉलरूमपर्यंत आला. ट्रम्प यांची राजकीय शैली सुरुवातीपासूनच वाद, विभाजन आणि आक्रमक वक्तव्यांनी व्यापलेली आहे. ट्रम्प यांच्या स्थलांतरविरोधी कठोर धोरणामुळे हजारो कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त झाले.

रोजगाराच्या शोधात अमेरिकेत आलेल्या तरुणांना गुन्हेगारांसारखे वागवून त्यांना देशाबाहेर हाकलण्यात आले. अशा वातावरणातून निर्माण झालेला संताप आणि असुरक्षितता आता हिंसक स्वरूपात बाहेर पडत आहे. कालच्या हल्ल्याचा प्रयत्न हा केवळ सुरक्षा यंत्रणेतील त्रूटी नसून ट्रम्प यांच्या धोरणाविरोधातील खोलवर साचलेल्या असंतोषाचा उद्रेक आहे. अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेची स्थितीही चिंताजनक आहे. अनेक स्तरांवरील समन्वयाचा अभाव आणि ढिसाळ तपासणी यामुळे अध्यक्षांसारख्या सर्वोच्च पदालाही धोका निर्माण होतो ही वस्तुस्थिती अत्यंत गंभीर आहे. ट्रम्प यांच्यावर या पूर्वीही प्राणघातक हल्ल्याचे प्रयत्न झाले, हे त्यांच्या नेतृत्वाविषयी वाढत्या अस्वस्थतेचे द्योतक आहे तरीसुद्धा ट्रम्प स्वत:ची तुलना इतिहासातील महान नेत्यांशी करण्याची धडपड करतात ही धक्कादायक गोष्ट म्हणावी लागेल. जॉन एफ. केनेडी आणि अब्राहम लिंकन यांच्यावर झालेले हल्ले हे लोकशाही मूल्यासाठी उभे राहणा-या नेतृत्वावर झालेले आघात होते. त्यांच्या बलिदानाच्या उंचीशी ट्रम्प यांच्या राजकारणाची तुलना करणे हा केवळ इतिहासाचा अपमान नाही तर जनतेची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. ट्रम्प यांचे राजकारण हे सहिष्णुता, समावेशकता आणि लोकशाही मूल्यांपेक्षा भीती, द्वेष आणि विभाजन यावर उभे आहे. अशा नेतृत्वाने स्वत:ला लिंकनसारख्या राष्ट्रपुरुषाच्या पंक्तीत उभे करण्याचा प्रयत्न करणे ही केवळ हास्यास्पद बाब नव्हे तर धोकादायक प्रवृत्ती आहे. कारण ती समाजात खोट्या नायकांची निर्मिती करते.

या घटनेवर भारताचे पंतप्रधान मोदी यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली; परंतु या प्रतिक्रियेमागील राजनैतिक परिपक्वता आणि स्वायत्तता यावर प्रश्न उपस्थित होतात. आंतरराष्ट्रीय संबंध हे व्यक्तिगत जवळीकीवर नव्हे तर राष्ट्रीय हित आणि मूल्यांवर आधारित असले पाहिजेत अन्यथा ते परावलंबित्वाचे लक्षण ठरते. सध्या इराण युद्धावरून ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत चोहोबाजूंनी टीका होत आहे. त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाचे खासदारही त्यांच्या विरोधात गेले आहेत. त्याच वेळी अतिसुरक्षित परिसरात हा प्रकार घडल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. परवाच्या गोळीबाराच्या घटनेनंतर एफबीआय संचालक भारतीय वंशाचे काश पटेल यांची लवकरच हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काश पटेल हे ट्रम्प यांचे अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात. गत काही महिन्यांपासून ते विविध वादाच्या भोव-यात अडकले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR