लातूर : प्रतिनिधी
अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (अनामिक मद्यपी) ए. ए. या विश्वव्यापी संघटनेचा १० जुन रोजी जागतिक ९१ वा वर्धापन दिन आहे. लातूर शहरात या संघटनेची स्थापना दि. २९ मार्च २००९ रोजी झाली. दोन-चार जणांनी एकत्र येत या संघटनेचे काम सुरु केले होते. गेल्या १७ वर्षांत या संघटनेचे २ हजारपेक्षाही अधिक सदस्य झाले आहेत. म्हणजेच या संघटनेला १७ वर्षांत २ हजार व्यक्ती व्यसनमुक्त करता आले आहेत.
अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस म्हणजे अनामिक मद्यपी. हि मद्यपींची संघटना होय. ही संघटना मद्यपींनी मद्यपिंसाठी मद्यपिंकडूनच चालवलेली गटोपचार पद्धत आहे. या संघटनेच्या ए. ए. सभांमध्ये ए. ए. बांधव मद्यपानाच्या काळातील अनुभव त्यासोबतच संघटनेच्या मदतीने प्राप्त केलेली मद्यमुक्ती आणि सुधारलेले समाधानी आयुष्य कथन करतात. थोडक्यात ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’, असा हा जीवनोपयोगी सन्मार्ग आहे. त्यामुळे ए. ए. बांधवांचे मानसिक धैर्य, जगण्याची नवी आशा आणि दृढ आत्मविश्वास वृद्धिंगत होत असतो. संघटनेत कोणताही भेदभाव, जातीधर्म, उच्चनिच्चता नसून समानता आणि स्वावलंबनाची विचारधारा रुजवली जाते. केवळ मद्य सोडण्याची इच्छा असणे ही एकमेव अपेक्षा असून पैसा, देणगी, फी किंवा वर्गणी आकारली जात नाही.
मद्यपान करणा-या व्यक्तीच्या कुटूंबात कधीच सुख, शांती नसते. लातूर शहरातील असंख्य व्यक्ती व्यसनाधिन आहेत. व्यसन हे एक मानसीक आजार आहे. त्यामुळे या आजारातून या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी कुटूंबातील प्रत्येक घटक प्रयत्न करीत असतो. परंतू, ते प्रत्येक कुटूंबियांना जमेलच असे होत नाही. त्यामुळे अल्कोहोलिक्स अॅनॉनिमससारख्या संघटनेच्या चळवळीची गरज असते. त्यामुळे १७ वर्षांपुर्वी लातूर शहरातील काही व्यसनी तरुणांनी एकत्र येत अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस संंघटनेची स्थापना केली. दोन-चार जणांच्या प्रयत्नातून सुरु झालेले हे व्यसनमुक्तीच्या कामाच्या कक्षा आज रुंदावल्या आहेत. २ हजारपेक्षाही अधिक व्यसनाधिन व्यक्ती व्यसनमुक्त झाले आहेत. मद्य सोडण्याची इच्छा असणा-यांनी या संघटनेत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
















