लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर आणि सुरक्षित वाहन चालवण्याबाबत पोलीस प्रशासनामार्फत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. मात्र निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघाती मृत्यूंच्या घटना चिंताजनकरीत्या समोर येत आहेत. दि. २ व ३ जून रोजी घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक माजी सरपंच आणि दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
चाकुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. २ जून रोजी सायंकाळी नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील चौकात झालेल्या अपघातात पंडीत नामदेव पवार (वय ५७ वर्षे), रा. शंकरनगर तांडा, ता. चाकुर यांचा मृत्यू झाला. फिर्यादी वैजनाथ पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमएच-२४-बीडब्ल्यू-०३५७ क्रमांकाच्या वाहनाच्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंडीत पवार यांचा मृत्यू झाला. ते आपल्या परिसरातील माजी सरपंच म्हणून परिचित होते.
लातूर शहरातील पीव्हीआर चौक परिसरात सकाळी आणखी एक दुर्दैवी अपघात घडला. सीईटी परीक्षेच्या वर्गासाठी जात असताना दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा त्यांचे ताब्यातील मोटारसायकल व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार अल्पवयीन मुलाने पालकांना न सांगता दुचाकी घेतली होती. वेगाने जात असताना झालेल्या या अपघातात दोन्ही विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनांमध्ये प्राथमिक तपासात संबंधितांनी हेल्मेटचा वापर केला नसल्याचे समोर आले आहे. रस्ते अपघातांमध्ये डोक्याला होणारी गंभीर दुखापत ही मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असल्याचे अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे.
















