अहमदपूर : प्रतिनिधी
श्री लोहारे डी. बी. गुरुजी यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अहमदपूर येथे आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष योग प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.
विद्यालयातील योग शिक्षक गौरव चवंडा यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगत विविध योगासने व योगक्रिया प्रत्यक्ष करून दाखवल्या. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, प्राणायाम तसेच श्वसनाच्या विविध पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे फायदे पटवून दिले. गौरव चवंडा यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, ‘योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैलीचा आधार आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, एकाग्रता वाढते आणि तणाव कमी होण्यास मदत होते.’
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विविध योगासने सादर केली. योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. योगाभ्यासामुळे निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन शिंदे, उपमुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक विजय चव्हाण, इतर शिक्षकवृंद व कर्मचा-यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना नियमित योग करण्याचे आवाहन केले. योग दिनाच्या पूर्वतयारीमुळे विद्यालयात आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी विशेष उत्सुकता दिसून आली.
















