वैशालीनगर : प्रतिनिधी
मांजरा परिवारातील अग्रणी असलेल्या विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी (ता. लातूर) या कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ साठी ऊस उत्पादक शेतक-यांना दिलासा देणारा निर्णय घेत प्रति मे. टन ३१७१ रुपये , असा अंतिम ऊस दर जाहीर केला आहे. तसेच अंतिम हप्त्यायापोटी ३२१ रुपये प्रति मे.टनाप्रमाणे ऊस बिल शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा माजी आमदार वैजनाथराव शिंदे आणि कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
गाळप झालेल्या ऊसाला कारखान्याने यापूर्वीच प्रति मे. टन २८५० रुपये प्रमाणे बील अदा केले असून, सध्या खरीप पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे मशागत, पेरणी, बियाणे, खते आदींसाठी शेतक-यांना पैशाची गरज भासणार आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी हिताचा निर्णय घेत कारखान्याने उच्चांकी ऊस दर जाहीर करुन अंतिम हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.
मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख आणि कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांच्या हिताचा विचार करून प्रति मे. टन ३१७१ रुपये प्रमाणे उच्चांकी ऊस दर अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने ६,५१,४३१.२३६ मे.टन उसाचे गाळप केले. यात १२.२१ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला असून, ७,१४,४७० क्विंल साखर उत्पादन झाले आहे. तसेच कारखान्याने ४ कोटी ७८ लाख ८० हजार ६०० युनिट वीज निर्मिती करून यातील २ कोटी ८२ लाख युनिट वीज निर्यात केली आहे. डिस्टीलरी प्रकल्पातून १ कोटी ०१ लाख लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे.
















