नांदेड : प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने आपल्या दोन मुलांसह कार गोदावरी नदीत टाकून आत्महत्या केली होती. मात्र शिक्षक आणि दोन मुलांच्या मृत्यू प्रकरणाला शवविच्छेदन अहवालानंतर धक्कादायक वळण मिळाले आहे. आत्महत्येपूर्वी शिक्षक पित्यानेच दोन्ही मुलांची धारदार चाकुने हत्या केल्याची सत्यता उघड झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या ४२ वर्षीय सुनील मोरे या शिक्षकाने शुक्रवारी १६ जुलै रोजी सकाळी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली होती. नांदेड – मुदखेड मार्गावरील आमदूरा पुलावरून भरधाव वेगाने त्याने गोदावरी नदीत गाडी घातली होती. या गाडीत त्याची १४ वर्षीय मुलगी सारा आणि १० वर्षीय मुलगा सुमेध हे दोघे सोबत होते.
आत्महत्येपुर्वी या शिक्षकाने गट शिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम व सहकारी शिक्षक दत्ता पवळे यांच्या त्रासाला कंटाळून मुलांसह आत्महत्या करत असल्याच स्टेटस त्याने व्हाट्सअप वर ठेवले होते. शिवाय तसा एक मॅसेज देखील मयत सुनील मोरे याने मित्रांच्या ग्रुपवर टाकला होता. मयत सुनील मोरे याच्या मृत्यू प्रकरणी वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार जणांवर ऍट्रॉसिटी आणि मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा उपरोक्त चौघांवर दाखल केला. दरम्यान आपल्या दोन्ही मुलांसह त्याने गाडी नदीत घातली अस प्रथमदर्शनी वाटत होती.
मात्र या निर्दयी पित्याने गाडी नदीत घालण्यापूर्वीच मुलगी सारा आणि मुलगा सुमेध यांच्या छातीवर, पोटात चाकुने वार करून त्यांची हत्या केली. यानंतर दोन्ही मुलांच्या मृतदेहासह गाडी नदीत घालुन आपलेही जीवन संपवले. तिघांचे मृतदेह काढून शनिवारी शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान पोलिसांना शवविच्छेदनाचा हा अहवाल प्राप्त झाला असून त्यात दोन्ही मुलांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. हे धक्कादायक सत्य उघड होताच पोलिसांनी स्वत: फिर्याद देऊन मयत सुनील मोरे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती इतवारा विभागाचे पोलिस उपाधीक्षक प्रशांत शिंदे यांनी दिली आहे.
















