नागपूर : प्रतिनिधी
नागपूरच्या कन्हान परिसरातील तारसा रोडवरील निलज शिवारात शुक्रवारी रात्री झालेल्या दुर्दैवी अपघातात ई-रिक्षाखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकित भारत पाटील हे ई-रिक्षा चालवत होते. त्यांच्या सोबत पत्नी शीतल पाटील प्रवास करत होत्या. रात्रीच्या वेळी तारसा रोडवरील निलज शिवारातून जात असताना ई-रिक्षाचा हेडलाईट अचानक बंद पडला. अंधारामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ई-रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली.
या अपघातात शीतल पाटील या ई-रिक्षाखाली दबल्या गेल्या. त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही तातडीने कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी शीतल पाटील यांना मृत घोषित केले. दरम्यान, चालक अंकित पाटील यांनाही डोके, कंबर आणि पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात वाहन निष्काळजीपणे चालवल्यामुळे अपघात घडल्याचे समोर आल्याने अंकित भारत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
















