देवणी: बाळू तिपराळे
शेतात राबूनही यंदा हातात उत्पन्न आले नाही, जनावरांच्या चा-यापासून पिण्याच्या पाण्यापर्यंतची चिंता कायम आहे. अशा परिस्थितीत घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने दुष्काळग्रस्त शेतकरी आर्थिक संकटासोबतच मानसिक तणावालाही सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर देवणी तालुक्यातील कर्जदारांना वसुलीच्या नावाखाली त्रास देऊ नये, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रामलिंग शेरे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली.
शेतक-यांना मानसिक त्रास देऊ नये
देवणी तालुक्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतक-यांच्या हाताला उत्पन्न नाही, शेतीत केलेला खर्चही निघालेला नाही. अशा परिस्थितीत कर्जवसुलीसाठी शेतक-यांना धमकावणे किंवा मानसिक त्रास देणे योग्य नाही. जिल्हा प्रशासनाने बँका, फायनान्स संस्था व खासगी सावकारांना योग्य सूचना देऊन सक्तीच्या वसुलीला आळा घालावा. दुष्काळग्रस्त शेतक-यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रामलिंग शेरे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
















