लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडरच्या लोखंडी टाक्या चोरी करून त्यांची विक्री करणा-या आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत २० ऑक्सिजन सिलेंडरच्या लोखंडी टाक्या, चोरीच्या ५१ सिलेंडर विक्रीतून मिळालेली १ लाख ७७ हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप असाह्या १४ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांसह नांदेड जिल्ह्यातील मुखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ११ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथकास निर्देश दिले होते. दि. ४ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ऑक्सिजन सिलेंडर चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत काळे बोरगाव येथील तानाजी चौक परिसरात बोलेरो पिकअप वाहनामध्ये चोरीचे ऑक्सिजन सिलेंडर विक्रीसाठी घेऊन एक इसम थांबलेला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बोलेरो पिकअप वाहनासह उमाकांत सुरेश पानगावकर (वय ३६, रा. पिंप्री अंबा, ता. जि. लातूर) हा मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्या बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडरच्या लोखंडी टाक्या मिळून आल्या. तसेच अंगझडतीमध्ये तब्बल ५१ सिलिंडरच्या टाक्या विक्री करून मिळवलेले १ लाख ७७ हजार रुपये रोख रक्कम
मिळून आली. अधिक चौकशी केली असता सदर ऑक्सिजन सिलेंडरच्या टाक्या अहमदपूर, बुधोडा, जांब व इतर ठिकाणांहून चोरी केल्याचे तसेच रोख रक्कम चोरीच्या सिलेंडर विक्रीतून प्राप्त झाल्याचे निष्पन्न झाले.
अभिलेख तपासणी व जप्त मुद्देमालाच्या आधारे लातूर जिल्ह्यातील विवेकानंद चौक, रेणापूर, अहमदपूर, गांधी चौक, एमआयडीसी, मुरूड, चाकूर, औसा तसेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
सदर आरोपीकडून ऑक्सिजन सिलेंडरच्या २० लोखंडी टाक्या १ लाख ४५ हजार रूपयांची, रोख रक्कम १ लाख ७७ हजार रूपये, बोलेरो पिकअप वाहन १२ लाख असा १४ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर
आरोपी व मुद्देमाल पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर गुरनं. ३०९/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस या गुन्ह्यात पुढील कायदेशीर कारवाईसाठी हजर करण्यात आला आहे.
















