लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील उद्योग भवन परिसरात असलेल्या उमाटे कुरियर कंपनीमध्ये कुरियरचे बॉक्स उतरावत असताना दि. ३१ ऑक्टोबर रोजी एका बॉक्सचा अचानक भीषण स्फोट झाला होता. या स्फ़ोटात नागनाथ स्वामी हा युवक गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर जखमी युवक नागनाथ स्वामीला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याने ५ दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र, अखेर आज त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
लातूरमधील उद्योग भवन परिसरातील उमाटे कुरिअर सर्व्हिस येथे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी कुरिअर पार्सल उतरवताना एक भीषण स्फोट झाला होता. कुरिअरच्या वाहनातून (टेम्पो) पार्सलचे बॉक्स खाली उतरवत असताना हा स्फोट झाला. या स्फोटामुळे टेम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि या कुरियरचे बॉक्स उतरविणारा कर्मचारी नागनाथ स्वामी गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाने केलेल्या प्राथमिक तपासानुसार त्या पार्सलमध्ये एअर पिस्तुलचे सीओ-२ (कार्बन डायऑक्साइड) गॅस कार्ट्रिज/सिलेंडर होते. बॉक्स खाली उतरवताना झालेल्या आदळआपट आणि घर्षणामुळे या गॅस कार्ट्रिजचा तीव्र स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला. या स्फोटात एका तरुणाला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
















