कर्ज वसुलीसाठी पत्नीला शिवीगाळ, अवमान अस झाल्याने टोकाचे पाऊल
लातूर शहरातील घटनेने खळबळ
लातूर : प्रतिनिधी
केवळ ४० हजारांच्या कर्जासाठी सतत तकादा लावून छळणा-या एका सावकाराने थेट घराच्या दरवाजात जाऊन आजू-बाजूच्या लोकांसमोर पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ करून अपमानित केले. या अवमानाचा धक्का सहन न झाल्याने शहरातील अवंतीनगर भागात राहणा-या ५० वर्षीय सौदागर कदम या इसमाने भाड्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, कर्जवसुलीसाठी तगादा लावून छळ करणा-या शहानवाज पठाणला अटक केली.
आरोपी शहानवाज पठाण (३१) याच्याकडून मयत सौदागर कदम यांनी ४० हजारांचे कर्ज घेतले होते. मात्र, काही कारणास्तव सौदागर कदम यांना कर्जाची परतफेड करता येत नव्हती. त्यामुळे आरोपी शहानवाज याने तगादा लावत चार-चौघात शिवीगाळ केल्याची घटना मयत सौदागर यांना सहन झाली नाही. त्यामुळे सौदागर कदम यांनी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपी शहानवाज पठाण याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी पठाण यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
एकीकडे बँका किंवा खाजगी सावकार, फायनान्सनी दुष्काळात कर्जवसुलीचा तगादा लावू नये, असे राज्य सरकार सातत्याने सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात दुष्काळी भागांत सातत्याने खाजगी फायनान्स, सावकार तगादा लावत आहेत. त्यामुळे संकटात सापडलेला सामान्य माणूस टोकाचे पाऊल उचलत आहे, यावर सरकार आणि प्रशासन कठोर पाऊल उचलणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिस ठाण्यात
घेतली नाही दखल
४० हजारांच्या कर्जावरून सौदागर कदम यांना सातत्याने धमकी दिली जात होती. अर्थात, कर्जवसुलीसाठी तगादा लावतानाच त्यांना मानसिक त्रास दिला जात होता, अशीही माहिती समोर आली. यावरून कदम यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. परंतु त्याची वेळीच दखल घेण्याऐवजी त्यांना पोलिस ठाण्यातून हाकलून दिले. त्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
















