बंगळुरू : वृत्तसंस्था
टाटा ग्रुपची कंपनी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड आता युरोपियन विमान वाहतूक कंपनी ‘एअरबस’ सोबत मिळून भारतात हेलिकॉप्टर बनवणार आहे! या दोन्ही कंपन्या कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात भारतीय हवाई दलासाठी एच१२५ हेलिकॉप्टरची अंतिम असेंब्ली लाइन उभारणार आहेत.
एका अहवालानुसार, हे भारतातील पहिले खासगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर असेंब्ली युनिट असेल. या प्रकल्पामुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला अधिक बळकटी मिळेल आणि एरोस्पेस उत्पादनात भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलेल.
हे युनिट ‘एअरबस’चे सर्वाधिक विक्री होणारे नागरी श्रेणीतील एच१२५ हेलिकॉप्टर तयार करेल. महत्त्वाचे म्हणजे, असा प्लांट उभारणारा फ्रान्स, अमेरिका आणि ब्राझील नंतर भारत जगातील चौथा देश ठरणार आहे.
सुरुवातीला या युनिटची वार्षिक उत्पादन क्षमता १० हेलिकॉप्टरची असेल, पण येत्या काळात त्यात वाढ केली जाईल. एअरबसने पुढील २० वर्षांत भारत आणि दक्षिण आशियामध्ये ५०० हलक्या हेलिकॉप्टरची मागणी असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
हा प्लांट बंगळुरूपासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर असलेल्या वेमगल औद्योगिक क्षेत्रात उभारला जाईल. याच ठिकाणी टीएएसएलचे इतर युनिट्सही कार्यरत आहेत. टाटाने नुकतीच वेमगल औद्योगिक क्षेत्रात ७.४ लाख चौरस फुटांची जागा घेतली आहे, जिथे विमान निर्मिती, अंतिम असेंब्ली आणि एमआरओ सुविधा देखील स्थापन केल्या जातील. एकूणच, हा प्रकल्प भारतीय एरोस्पेस उद्योगासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे आणि भारताची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढवण्यास मदत करेल.