जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील गव्हाण गावा येथे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भर उन्हाळ्यात चार दिवसांनी एकदा नळाला पाणी येत असल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. जळकोट तालुक्यातील गव्हाण हे गाव तिरू नदीकाठी वसलेले आहे. या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीरही तिरू नदीकाठीच असल्यामुळे तिरु नदीतील पाण्यावरच या गावातील गावक-यांची तहान अवलंबून आहे परंतु गव्हाण परिसरातील तिरु नदी पात्र हे कोरडे ठाक आहे. यामुळे विहीरही कोरडी पडली आहे . या कारणाने पाणीपुरवठ्यास व्यतय निर्माण झाला आहे. गव्हाण गावाजवळ असलेला बंधारा कोरडा पडल्यामुळे येथील ग्रामपंचायतच्या वतीने बंधा-याच्या खालच्या बाजूला जेसीबीने खड्डा खोदून या खड्ड्यात पाणी साठल्यावर येथील पाणी विहिरीत सोडले जात आहे व विहिरीतून गावातील नळाला पाणी सोडले जात आहे. गावातील पाणीपुरवठा व्यवस्थित राहावा यासाठी ग्रामपंचायतीस चक्क नदीपात्रातच खड्डा खोदावा लागला आहे. नदीपात्रात खोदलेल्या खड्ड्यात किती दिवस पाणी येणार यावरच पुढचे नियोजन ठरणार आहे.
अधिग्रहणाचा प्रस्ताव दाखल करणार
गव्हाण गावात सध्या चार दिवसांनी एकदा पाणी सोडले जात आहे. नदीपात्र कोरडे असल्यामुळे विहीरही कोरडी पडली आहे . यामुळे नदीपात्रातच खड्डा खोदून यातून पाणी उपसून विहिरीत टाकले जात आहे व विहिरीतून ते नळाला सोडले जात आहे. येणा-या काळात असाच उन्हाळा राहिला तर या खड्ड्यांमध्येही पाणी येणार नाही अशीच शक्यता आहे. यामुळे गावक-यांना पाणी कमी पडू नये यासाठी बोअर अधिग्रहण केले जाणार असून याचा प्रस्ताव लवकरच पंचायत समितीकडे सादर केला जाणार आहे . -विजयकुमार भोसले (ग्रामपंचायत अधिकारी गव्हाण)

