जळकोट : प्रतिनिधी
पंचायत समिती ही सरकार आणि ग्रामपंचायत या मधला दुवा असते. पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विकासाच्या योजना गाव पातळीवर पोहोचत असतात, या विकास योजना पोहोचत असताना, काही नागरिकांना याबाबत अडचणीही येतात. या अडचणी सोडविण्यासाठी पंचायत समितीमध्ये आमसभेचे आयोजन करण्यात येते मात्र गत सहा वर्षांपासून पंचायत समितीमध्ये आमसभाच झाली नाही. याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
जळकोट तालुक्याची निर्मिती ही सन १९९९ यावर्षी झाली. यावर्षीपासून जवळपास निवडणुकीचा कालावधी सोडला तर प्रत्येक वर्षी आमसभा झालेली आहे. माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार दिवंगत चंद्रशेखर भोसले , माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या काळामध्ये दरवर्षी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आम सभा झालेल्या आहेत. या आमसभेमध्ये तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुकास्तरावरील विविध विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील ज्या नागरिकांच्या अडचणी आहेत असे नागरिक या आमसभेस उपस्थित राहत असत तसेच या आमसभेस आमदारांचीही विशेष उपस्थिती असायची.
यावेळी या आमसभेत नागरिक हे आपल्या अडीअडचणी सांगायचे व त्याची शहानिशा लगेच व्हायची. यामुळे काही नागरिकांची कामेही जागेवरच व्हायची परंतु गेल्या सहा वर्षापासून जळकोट पंचायत समितीची आमसभाच झाली नाही. विशेष म्हणजे तीन ते चार वर्ष निवडणूक नसल्यामुळे प्रशासकाच्या हातीच कारभार होता तर निवडणुकीपूर्वी एक वर्ष आमसभा झाली नाही व आता पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन दोन अडीच महिन्याचा कालावधी झाला तरीही अद्यापही आमसभा झालेली नाही. नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आमसभा होणे गरजेचे असून जळकोट पंचायत समितीची आमसभा लवकर कार्यान्वित करावी, अशी मागणी आता जळकोट तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

