Homeलातूरनिलंगा येथील बा रुग्ण विभाग वैद्यकीय अधिका-यांविना

निलंगा येथील बा रुग्ण विभाग वैद्यकीय अधिका-यांविना

निलंगा : प्रतिनिधी
गोरगरिबांचे मंदिर मानल्या जाणा-या निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवांबाबत अनियमितता समोर आली आहे. रुग्णालयात कार्यरत असलेल्या कायमस्वरूपी वैद्यकीय अधिका-यांकडून बा रुग्ण विभाग (ओपीडी) मध्ये रुग्ण तपासणी होत नसून, ती जबाबदारी आयुर्वेदिक पदवीचे शिकाऊ विद्यार्थी पार पाडत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रुग्ण उपचारासाठी येत असताना, त्यांची तपासणी अनुभवी डॉक्टरांकडून न होता विद्यार्थ्यांकडून केली जात असल्याने रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची तक्रार केली जात आहे. यामुळे अनेक रुग्णांचे आजार बरे होण्याऐवजी अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकाराची दखल घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांनी रुग्णालयाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी (स्पॉट पंचनामा) केली. या वेळी रुग्णालयात एकूण १५ वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतानाही केवळ ४ डॉक्टर उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. उर्वरित अधिकारी अनुपस्थित असल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाल्याचे त्यांनी सांगितले. हृदयरोग, सर्पदंश, विषबाधा यांसारख्या गंभीर रुग्णांना उपचाराऐवजी तत्काळ लातूर येथे रेफर केले जात असल्याने हे उपजिल्हा रुग्णालय ‘रेफरिंग सेंटर’ बनले आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अनेक वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसून लातूर येथे खाजगी दवाखाने चालवत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

या सर्व प्रकार म्हणजे ‘वैद्यकीय निष्काळजीपणाचा कळस’ असून डॉ. भिकाने यांनी संबंधित वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुलकर्णी यांना जाब विचारत लेखी निवेदन दिले. भविष्यातही ओपीडीमध्ये डॉक्टर अनुपस्थित आढळल्यास मनसेच्या शैलीत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार, जिल्हा सचिव प्रदीप शेळके, शहराध्यक्ष अबू बकर सय्यद, गणेश उसनाळे, सदाशिव हाडोळे, शिवराज चिंचोळे, विकास सूर्यवंशी, संतोष जाधव, महेश सावनगिरे, मल्लिकार्जुन चिंचोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR