चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील शेतक-यांनी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व तयारीसाठी वेग घेतला आहे. पावसाचे आगमन जवळ आल्याने शेतकरी सध्या शेतातील मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत असून ग्रामीण भागात खरीप हंगामाची लगबग सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
चाकूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी शेतजमीन पेरणीयोग्य बनविण्यासाठी नांगरणी, कुळवणी, वखरणी आदी कामांमध्ये व्यस्त आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्राथमिक मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी अंतिम मशागतीच्या टप्प्यात अनेक शेतकरी अजूनही बैलांच्या साहाय्याने पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात यांत्रिकीकरणासोबतच पारंपरिक शेतीपद्धतीचेही दर्शन घडत आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्यक असलेल्या बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदीसाठी शेतक-यांची बाजारपेठांकडे धाव सुरू झाली आहे. चाकूर शहरासह तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांवर शेतक-यांची गर्दी वाढली असून विविध कंपन्यांच्या बियाणे व खतांची खरेदी जोरात सुरू आहे. विशेषत: सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या बियाण्यांची मागणी वाढत आहे.
दरम्यान, बियाणे व खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतक-यांमध्ये काही प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे. खरीप हंगामात तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने सोयाबीन बियाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या दरांमुळे आणि संभाव्य टंचाईची शक्यता लक्षात घेऊन अनेक शेतक-यांनी यंदा घरगुती सोयाबीन बियाण्याची साठवण करून ठेवली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सध्या शेतीच्या तयारीत गुंतला असून येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात सध्या खरीपपूर्व कामांची लगबग आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
















