चाकूर : प्रतिनिधी
ज्या समाजात आपण लहानाचे मोठे झालो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो हे जरी सत्य असले तरी अनेक गुणवंतांना याच गोष्टीचा विसर पडत चालला आहे म्हणून शिक्षीत आणि शोषणमुक्त समाजाच्या निर्र्मितीसाठी गुणवंतांनी त्याग आणि समर्पित भावनेने समाजोन्नतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जेष्ठ विचारवंत तथा लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ.माधवराव गादेकर यांनी केले.
लहुजी शक्ती सेना चाकूर आयोजित शहरातील नगरपंचायतच्या सभागृहात माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगासेवक कपिल माकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात चाकूर तालुक्यातील मातंग समाजातील इयत्ता १० वी व १२ च्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उतीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते उद्घाटक पाहुणे म्हणून बोलत होते. विचारपीठावर लहुजी शक्ती सेनेचे राज्य प्रवक्ते डॉ.दयानंद कांबळे, माजी नगराध्यक्ष मिलींद महालिंगे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य रामभाऊ कसबे रानबा नाईकवाडे, हणमंते, केसराळीकर, छगनराव गायकवाड, चरक सौदागर सागर भैय्या आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.गादेकर म्हणाले की, आम्ही गेल्या चार दशकांपासून अविरतपणे सुरु ठेवलेल्या सामाजिक कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे, एवढेच नव्हे तर आर्थिकदृष्टया मागास असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आमच्याकडून मदत झाली त्यामुळे ते शिकले मोठे झाले याचा आनंद वाटतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष संतराम मोठेराव यांनी केले तर सुत्रसंचालन विश्वनाथ कलवले यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार चाकूर तालुकाध्यक्ष रामजी मोठेराव यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिवाकर मोठेराव, आत्माराम मोठेराव, श्रीहरी मोठेराव, अनिकेत कांबळे, राजाराम दुवे, विजय समुखराव, मारोती गायकवाड आदींनी अथक परिश्रम घेतले. यावेळी चाकूर आणि परिसरातील गुणवंत विद्यार्थी पालक व समाज बांधवांची उपस्थिती होती.
















