Homeमहाराष्ट्रचुका तुमच्या, त्याचा भुर्दंड जनतेला का?

चुका तुमच्या, त्याचा भुर्दंड जनतेला का?

मोदींना पत्र लिहित राज ठाकरेंनी सुनावली खरीखोटी

मुंबई : प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. १० मे) एका भाषणात जनतेला संबोधित केले. या संबोधनातून त्यांनी जनतेला सोने खरेदी करू नका, वर्षभर परदेशातील प्रवास करू नका असे उपदेश केले. मोदींच्या या आवाहनानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी मोदींच्या या आवाहनांवर टीका केली आहे. त्यानंतर आता याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या या आवाहनांवर एक नाही तर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? असा सवाल विचारत राज ठाकरेंनी मोदींवर आगपाखड केली आहे.

१० मे रोजी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या उपदेशानंतर जनतेमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता. १२ मे) फेसबुक, प्लॅटफॉर्म या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि त्यांनी केलेल्या आवाहनांबाबत भलीमोठी पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी थेट मोदींना, त्यांच्या सहका-यांना आणि गेल्या १० वर्षांतील त्यांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

राज ठाकरेंनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हटले आहे की, ‘सस्नेह जय महाराष्ट्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचे आवाहन केले. सोने खरेदी जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणा-या गाड्या जास्त वापरा, ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का? तर, सोने, पेट्रोल-डिझेल हे आयात करावे लागते आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणावर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढले आहेत.’ असे लिहिले.

‘बरं, मग स्वत: पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वत:वर फुलं उधळून घेत आहेत त्याचे काय करणार आहात आपण? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असे करणार नाही असे सांगणार आहात का? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का?’ असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असे नाही. २००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात (जेव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेव्हा ओपेकने खनिज तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वत: मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असे आवाहन केले नाही की तेव्हा मोदींनी केले नाही. मग आत्ताच का? खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचे जे काही कंबरडे मोडून ठेवले आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीत.

‘लाडकी बहीण’ योजनेने अर्थव्यवस्था मोडकळीस
ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुका असोत की इतर कुठल्याही निवडणुका ‘रेवड्या’ वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असे पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ?

पाच राज्यांच्या निवडणुकांत पेट्रोल, डिझेलचा अपव्यय
पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असे पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचले? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसे त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेले तेव्हा का नाही सुचले? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवले तेव्हा का नाही सुचले?

तुम्ही परदेश दौरे थांबवा

गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला का जायचे? स्वत: पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौ-यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा, असे स्पष्टपणे राज ठाकरेंनी सांगितले आहे. तर, लाल बहाद्दूर शास्त्रींनी पाकिस्तान युद्धाच्या वेळेस असेच आवाहन केले होते पण त्यात त्यांनी स्वत: ते कृतीत उतरवले होते.

तुमची ‘मन की बात’ खूप झाली
माझी पंतप्रधानांना विनंती आहे की नैतिक आवाहन आणि त्याचा भार लोकांनी सहन करायचा हे सगळे बास झाले. एकदा मान्य करूया की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आहे आणि यांचे नुसते खापर इराण-इस्रायल युद्धावर टाकू नका! तुमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बँकेच्या तीन गव्हर्नर्सनी राजीनामे दिले ते का दिले? मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तसेच विद्वान होते तरीही ते अनेक तज्ज्ञांबरोबर बसून चर्चा करायचे, ऐकून घ्यायचे. आपण तर साधा व्यवसाय सुद्धा केलेला नाहीत तर आपल्याला हे कसं समजणार? तुमची ‘मन की बात’ खूप झाली. आता ख-याखु-या अर्थतज्ज्ञांची ‘मन की बात’ पण ऐका, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.

परिस्थिती का ओढावली यावर उत्तर द्या
देशावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी पुढे तुम्ही काय पाऊले उचलणार आहात हे जनतेला सांगा. संसदेला सांगा. तसेही हवे तेव्हा विशेष अधिवेशन घेण्याची प्रथा पडली आहेच. त्यामुळे संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या. असे स्पष्टपणे राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR