मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तब्बल दोन दशकांपासून गाजणा-या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड खटल्याच्या निकालाची प्रतीक्षा आणखी काही दिवसांनी वाढली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल आज लागण्याची दाट शक्यता होती; मात्र निकाल देण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचे सांगितले.
आज सकाळी ११ वाजता या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली, तेव्हा पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह न्यायालयात उपस्थित होते. तसेच, या घटनेत मृत झालेले पवनराजेंचे चालक समद काझी यांचे कुटुंबही न्यायाच्या आशेने मुंबईत दाखल झाले होते. मात्र, न्यायाधीशांनी निकालासाठी पुढील तारीख दिल्यामुळे दोन्ही कुटुंबांची प्रतीक्षा आणखी ताणली गेली आहे. यापूर्वी १४ मे रोजी झालेल्या सुनावणीत मुख्य आरोपी डॉ. पद्मसिंह पाटील आणि मोहन शुक्ला यांनी वैद्यकीय कारणास्तव मुदत मागितली होती.
२००६ मध्ये झाली होती हत्या
राजकीय वैमनस्यातून ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून हा थरार घडवला होता. सीबीआयच्या तपासांनुसार, ही हत्या २५लाखांची सुपारी देऊन घडवून आणली गेली होती आणि यामध्ये राज्याचे माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. या खटल्यात डॉ. पाटील यांच्यासह शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशातील बसपा नेते कैलास यादव, शशीकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमल जैन असे एकूण ९ आरोपी आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील हे सप्टेंबर २००९ पासून जामिनावर बाहेर आहेत.
धाराशिव पोलिस हायअलर्टवर
दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात पोलिसांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. डॉ. पद्मसिंह पाटील आणि निंबाळकर गट यांच्यातील राजकीय संघर्ष पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोकर यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कडक खबरदारी घेतली जात आहे. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात असून, सोशल मीडियावरील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी सायबर पोलिस सज्ज आहेत.
















