लातूर : प्रतिनिधी
महिलांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्रमांक ८ मधील महात्मता गांधी चौकातील महालक्ष्मी मंदिर सभागृहात जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची जनजागृती करण्यात आली.
राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटीवन अॅग्री लि. च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या पुढाकारातून या विशेष मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी लक्ष्मीकांत कैले, व्यवसाय सुविधा केंद्राचे आदित्य देशमुख आणि तांत्रिक व्यवस्थापक तथा फिल्ड ऑफिसर प्रतीक देशमुख यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध उद्योग व स्वयंरोजगार योजनांची सविस्तर माहिती दिली.
प्रतीक देशमुख यांनी नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मिळणारे अनुदान, शासकीय कर्ज योजना, आवश्यक प्रशिक्षण, कागदपत्रे आणि प्रक्रिया या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करत उद्योजकता विकासाच्या विविध संधींची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी क्विक हिल फाउंडेशन आणि सायबर सेलच्या संयुक्त विद्यमाने वाढती सायबर गुन्हेगारी आणि ओटीपी फ्रॉडबाबत महत्त्वाची माहिती दिली. नेहल बुलानी व नम्रता तोर यांनी ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास नगरसेविका श्रावणी बालाजी झिपरे, प्रज्ञा स्नेहल उटगे, विलासराव देशमुख फाउंडेशनचे समन्वयक गजानन बोयणे, प्रशिक्षक क्रांती उफाडे, सोशल प्लॅनर सोमनाथ कावळे यांच्यासह प्रभाग क्र. ८ आणि गांधी चौक परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. आभार प्रज्ञा उटगे यांनी मानले. या उपक्रमामुळे शासकीय उद्योग योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत झाली आहे.
















