लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचा प्रस्तावित खाजगी शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) नोंदणी व नियमन कायदा जाचक असल्याने तो रद्द करावा, या मागणीसाठी लातूर जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने दि. ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित खाजगी शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) नोंदणी व नियमन कायदा हा लहान कोचिंग क्लासेस, स्थानिक शिक्षक आणि स्वयंरोजगार करणा-या सुशिक्षित युवकांसाठी अत्यंत जाचक व अन्यायकारक आहे. या कायद्यातील कठोर अटी, जाचक नियम, आर्थिक बोजा, दंडात्मक तरतुदी, वारंवार तपासण्या आणि प्रशासकीय नियंत्रण यामुळे हजारो लहान क्लासेस बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यामुळे प्रस्तावित कायदा रद्द करावा, लहान कोचिंग क्लासेस, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या व्यापक सल्लामसलतीशिवाय कोणताही नवीन कायदा लागु करु नये, सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे, शिक्षण क्षेत्रात इन्स्पेक्टर राज निर्माण करणा-या कोणत्याही तरतूदी लागु करु नयेत, विद्यार्थ्याचे हित, शिक्षकांचे रोजगार आणि लहान क्लासेसचे अस्तित्व कायम राहिल, असे धोरण तयार करावे, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांनी बाहेरील कोचिंग क्लासेस सोबत टाईप-अप करुन संस्थेच्या माध्यमातून स्वतंत्र कोचिंग फीस घेऊन क्लासेस चालवण्यावर तात्काळ बंदी घालावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात
आले.
















