31 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeसंपादकीय विशेषभारतीय प्रजासत्ताक दिन : चिंता आणि चिंतन

भारतीय प्रजासत्ताक दिन : चिंता आणि चिंतन

ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश हा ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला, स्वतंत्र झाला; परंतु हे स्वातंत्र्य आम्हास सहजासहजी प्राप्त झाले नाही. भगतसिंग, राजगुरूसारखे तरुण हसत हसत फासावर गेले. अनेक व्यक्तींनी आपले तारुण्य, आपले जीवन तुरुंगात घालवले. त्या ठिकाणी अनेक त्रास सहन केले. आणि या सर्वांच्या त्यागावर, बलिदानावर आम्हाला स्वतंत्र भारतात राहण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचे संविधान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि २६ जानेवारी १९४९ रोजी भारतातील सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; संधीची व दर्जाची समानता करून देणारे, राष्ट्राची एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून आम्हीच स्वत: प्रत अर्पण करून घेतले आहे. स्वत: प्रत अर्पण करून घेतलेले हे जगातील एकमेव संविधान आहे. ज्या दिवशी आम्ही हे संविधान स्वत: प्रत अर्पण करून घेतले तो दिवस भारतीय लोकशाहीत सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला, त्या दिवसालाच आपण प्रजासत्ताक दिन असे म्हणतो.

या प्रजासत्ताक दिनी देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती देशाला उद्देशून भाषण करतात. हा दिवस देशातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयांतून तिरंगा ध्वज फडकावून साजरा केला जातो. या प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. या संविधानामुळे शिक्षणाचा, रोजगाराचा अधिकार प्राप्त झाला. त्याचबरोबर राष्ट्रहितासाठी काही कर्तव्ये करण्याची जबाबदारी आली. या संविधानामुळे आम्हाला धर्मस्वातंत्र्य, धर्म आचरणाचा अधिकार प्राप्त झाला त्यामुळे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी आपले राष्ट्रीय सण म्हणून साजरे व्हायला हवेत; पण दुर्दैवाने या राष्ट्रीय सणांपेक्षा धार्मिक सणाला, उत्सवाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. २२ जानेवारी २०२४ रोजीच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा विधीतून हे अधिक स्पष्ट झाले आहे.

याचा अर्थ असे विधी होऊ नयेत असे कुणीही म्हणणार नाही आणि कुणी म्हणू नये. कारण भारतीय संविधानानेच सर्व धर्मीयांना ‘धर्मस्वातंत्र्य’ देऊन हा अधिकार दिला आहे. पण ज्या संविधानाने सर्व धर्मीयांना हा उत्सव साजरा करण्याचा अधिकार दिला आहे त्या संविधान अंमलाच्या दिवशी म्हणजे प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) असा उत्सव सर्व भारतीयांनी करणे गरजेचे नाही का? कारण भारतीय संविधानानुसार धर्म ही वैयक्तिक बाब आहे. आणि कोणत्याही धर्मातील विधी उत्सव हे त्या धर्मापुरतेच मर्यादित असतात. पण देशाचा स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) हे राष्ट्रीय सण आहेत म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध व अन्य धर्मीयांचेही हे सण आहेत. पण दुर्दैवाने भारतातील सर्व धर्मीयांना आपल्या धर्माचे सण महत्त्वाचे वाटतात.

त्याला कोणताही धर्म अपवाद नाही. स्वातंत्र्यानंतर कधीही या राष्ट्रीय सणाच्या आमंत्रणाच्या अक्षता वाटल्या गेल्या नाहीत. घराघरांतून राष्ट्रीय प्रेमाचा उमाळा दिसला. खरं तर राष्ट्रीय सण उत्स्फूर्तपणे साजरे करणे राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक आहे. पण दुर्दैवाने असे दिसत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ होऊ नये. या दोन बाबी वेगळ्या ठेवल्या पाहिजेत असे आमचे संविधान सांगते. पण आज धर्माच्या आधारेच निवडणुका, जात-धर्माच्या आधारे उमेदवार ठरवले जातात. याला भारतातील कोणताही पक्ष अपवाद नाही आणि दुर्दैवाने बहुतांश मतदार देखील जात-धर्म पाहूनच मतदान करताना दिसून येतात. आज तर सरळ सरळ हिंदू-मुस्लिम दोन भाग करूनच राजकारण केले जात आहे. ११टक्के मुस्लिमांना शत्रू मानून त्यांची अकारण भीती निर्माण करून व्होट बँक मजबूत केली जात आहे. इतरांना संविधानविरोधी ठरवून स्वत: संविधान बदलण्याचा आराखडा रचत आहेत. देशापेक्षा धर्म मोठा ठरवण्याचे षडयंत्र राबवले जात आहे. त्यामुळे अशा मंडळीला राष्ट्रीय सणापेक्षा धार्मिक सण मोलाचे वाटतात आणि या मानसिकतेतूनच मतदारांना मतपेटीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आज देशाला बेकारी, महागाई, स्त्री असुरक्षितता, शिक्षण, जातीयता या समस्यांनी ग्रासले आहे. आज अंधश्रद्धेचे वाटप मोठ्या श्रद्धेने केले जाते. या सर्व प्रश्नांची उत्तरे संविधानाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतात. पण हे प्रश्न, समस्या सोडवण्यात अपयश आल्यास सरकार, लोकांच्या धार्मिक भावनेला हात घालून त्यांचे लक्ष तिकडे वळवतात. आज नेमके तेच होत आहे. अशा उत्सवामुळे काही काळ लोकांचे लक्ष मूळ प्रश्नापासून दूर जाईल पण ते प्रश्न, त्या समस्या सुटणार नाहीत. त्या सरकारलाच कधी ना कधी सोडवाव्या लागतील. सर्वांत धोक्याची बाब म्हणजे मतपेटीतून सत्ता मिळवण्यासाठी ‘हिंदू राष्ट्रा’चे स्वप्न तमाम हिंदूधर्मीयांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असतानाच केवळ सत्तेसाठी ‘हिंदू राष्ट्रा’चे स्वप्न दाखविणे, त्या दिशेने वाटचाल करणे अखंड भारताच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी घटना ठरणार आहे. हिंदू राष्ट्राचे स्वप्न म्हणजे अनेक धर्मांचे, जातींचे, अनेक भाषा बोलणा-या, राहणा-या एकसंध भारताची फाळणी करण्यासारखे नाही का? या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे ८४ वर्षांपूर्वी भाकित केले होते. ‘ज्या दिवशी भारतात कुणी हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहील तो दिवस भारतासाठी धोक्याची घंटा ठरेल कारण अशा राष्ट्राची निर्मिती होणे म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता न्याय या तत्त्वांना तिलांजली देणे होय.’ त्याचप्रमाणे आपल्याबरोबरच स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानने स्वत:ला इस्लाम राष्ट्र म्हणून घोषित केले. त्या देशाची अवस्था काय आहे? हे समजून घेणे गरजेचे आहे. विविधतेत एकता असलेल्या संस्कृतीला अबाधित ठेवायचे असेल तर संपूर्ण भारतीयांमध्ये धार्मिक भावनेऐवजी राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविणे गरजेचे आहे. एखादी सुंदर इमारत जमीनदोस्त करणे फार सोपे आहे पण सुंदर इमारत नव्याने उभी करणे अतिशय अवघड असते.

-डॉ. सुरेश वाघमारे, लातूर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR