नाशिक : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचे आवाहन केल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही त्याचा पुनरुच्चार केला आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे जगभरात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत. त्यामुळे सध्याच्या जागतिक संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे आपण स्वयंपाकाचे तेल, पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचा कमी वापर केला पाहिजे. यावर उपाय म्हणून ज्या शहरांत मेट्रो आहे, तेथील लोकांनी मेट्रोचा वापर करावा. बैठकांसाठी व्हीडीओ कॉन्फरन्सिंग व वर्क फ्रॉम होम सारख्या पर्यायांचा वापर करावा, असे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी उपरोक्त विधान केले आहे.
छगन भुजबळ आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, आपण सर्वच देशांचा अभ्यास केला, माहिती घेतली तर त्या देशांत यापूर्वीच कितीतरी पटीने पेट्रोल- डिझेल व इतर इंधनांची दरवाढ झाली आहे. हे सर्व तुम्हीच रिपोर्टिंग करता. मी स्वत:ही ते पाहतो. याउलट आपला देश आतापर्यंत बराचसा मजबुतीने उभा आहे. याचे कारण असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सर्व सहका-यांनी पूर्वी आयात केल्या जाणा-या २७ देशांच्या तुलनेत आता ४५-५० देशांकडून आयात सुरू केली आहे. त्यातून आपला टिकाव लागला आहे. त्यानंतरही एकदम पहिल्यासारखी परिस्थिती होणे कठीण आहे. पण इतरांपेक्षा आपले चांगले आहे असे निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल.
राज्यात इंधनाचा तुटवडा नाही
उल्लेखनीय बाब म्हणजे छगन भुजबळ यांनी यापूर्वीच राज्यात पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले होते. सरकारने एलपीजी गॅसच्या पुरवठ्याचा काळा बाजार रोखण्यासाठी पथके नेमली आहेत. ही पथके कुठेही काळा बाजार आढळला तर त्यावर कारवाई करतील. केंद्राने शिल्लक गॅसचे वाटप करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे या प्रकरणी सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करणा-यांवर कारवाई केली जाईल. गरजेनुसार, केरोसिन वितरण करण्याची बाबही या प्रकरणी सरकारच्या विचाराधीन आहे.

