खरगे, दिग्विजयसिंग, देवगौडांचा कार्यकाल संपला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
निवडणूक आयोगाने १० राज्यांमधील २४ राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आता ही १८ जून रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून आहे. या जागांवरील विद्यमान सदस्य २१ जून ते १९ जुलै दरम्यान निवृत्त होत आहेत.निवृत्त होणा-या सदस्यांमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह २४ खासदारांचा समावेश आहे.
आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रत्येकी ४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन जागांसाठी मतदान होईल. झारखंडमध्येही तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. तसेच मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांमध्ये प्रत्येकी एका राज्यसभा जागेसाठी मतदान होणार आहे.
भुजबळांच्या नावाची चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी येत्या १८ जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या एका जागेसाठी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.
















