मुंबई : प्रतिनिधी
जून महिन्याच्या सुरुवातीला जोर धरलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून दांडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतक-यांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अशातच पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे. १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच पालघर, ठाणे आणि नवी मुंबई या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
त्याचसोबत उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक येथे जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता नसून ढगाळ आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट देण्यात आला आहे. सलग तीन दिवसांपासून नागपुरात पावसाची हजेरी लागणार आहे. नियमित सरींमुळे उकाडा आणि दमट वातावरणापासून नागपूरकरांना दिलासा मिळणार आहे.
















