मुंबई: प्रतिनिधी
‘मुंबई लोकलमध्ये रेल्वे स्थानकांविषयीची उद्घोषणा होते किंवा फलकावर येणारे स्थानक दर्शवले जाते. तशा प्रकारे सर्व लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये पुढील थांब्याविषयी उद्घोषणा व्हायला हवी. जेणेकरून प्रवाशांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली जाईल आणि धावत्या रेल्वेगाडीतून उतरण्याचे आणि जीव धोक्यात घालण्याचे प्रवाशांचे प्रकार कमी होतील, अशी महत्त्वाची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या निमित्ताने रेल्वे प्रशासनाला केली. त्यामुळे आगामी काळात लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये पुढील स्थानकाविषयी उद्घोषणा ऐकायला मिळू शकतात.
लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधून अनेक प्रवासी हे कमी अंतरावरील आपल्या इच्छितस्थळी पोचण्यासाठीही प्रवास करतात. ती रेल्वे कोणत्या स्थानकात थांबणार आहे, याची उद्घोषणा होत नसेल तर काही वेळा प्रवासी घाबरून चुकीचा निर्णय घेऊ शकतो. मात्र, त्याच क्षणी मानसिक संतुलन राखणे महत्त्वाचे असते. एखादा प्रवासी घाबरून मानसिक संतुलन गमावतो आणि स्वत:ला इजा करण्याची इच्छा नसताना तो धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करतो.
अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक स्वत:ला इजा करण्याचा कोणाचा हेतू नसतो. त्यामुळे अशावेळी प्रवाशाला दोष देता येणार नाही. म्हणून सामाजिक हिताच्या दृष्टीने रेल्वेत पुढील थांब्याविषयी उद्घोषणा होणे आवश्यक आहे. वंदे भारतमध्ये अशी उद्घोषणा प्रणाली आहे. तशीच सुविधा सर्व लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांत व्हायला हवी, असे निरीक्षण न्या. जितेंद्र जैन यांनी रोहिदास कुमावत यांच्या अपिलावरील निर्णयात नोंदवले.
सुमारे १० वर्षांपूर्वी कुमावत हे मनमाडहून जळगावकडे ‘गुवाहाटी एक्स्प्रेस’ने प्रवास करत होते. गाडी जळगाव स्थानकाजवळ पोहोचत असताना गर्दीमुळे त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि पायांना दुखापत झाली. त्यामुळे त्यांनी भरपाईसाठी रेल्वे अपघात न्यायाधिकरणात दावा केला होता. मात्र, ‘कुमावत यांना अपघातामुळे जखम झाली नसून त्यांनी स्वत:हून केलेल्या कृतीमुळे झालेली आहे. ते डब्याच्या दरवाजाजवळ बसले होते आणि गाडी जळगावला थांबणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी उतरण्याचा प्रयत्न केला असता ते पडले’, असा निष्कर्ष नोंदवत न्यायाधिकरणाने सन २०१८ मध्ये त्यांचा दावा फेटाळला होता. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपिल केले होते.
न्यायाधीकरणाचा
निर्णय अखेर रद्द
‘कुमावत हे वैध प्रवासी होते आणि जळगावसारख्या महत्त्वाच्या स्थानकावर सर्व गाड्या थांबतात. या समजुतीत त्यांनी प्रवास केला होता. गाडी जळगावला थांबणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर एखादा व्यक्ती धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा दुखापत होणे स्वाभाविक आहे’, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द केला.
नुकसानभरपाई देण्याचे आदेश
रेल्वेतून उडी मारून जखमी झालेल्या कुमावत यांना रेल्वेने मदत देणे गरजेचे असताना स्वत: होऊन उडी मारल्याचे कारण पुढे करीत प्राधिकरणाने मदतीच्या मागणीची याचिका फेटाळली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला १२ आठवड्यांच्या आत कुमावत यांना ८० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देऊन त्यांचे अपिल निकाली काढले.

