40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयमोदींचा जावईशोध!

मोदींचा जावईशोध!

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांविरुद्ध, विशेषत: काँग्रेसविरोधाचे तुणतुणे वाजवले. आपल्या दोन तासांच्या भाषणात त्यांनी आत्मस्तुती आणि विरोधकांचा द्वेष करण्यावरच धन्यता मानली. मोदी म्हणाले, विरोधी पक्षांनी विरोधी बाकांवरच राहण्याचा संकल्प केला आहे. येत्या निवडणुकीत ते प्रेक्षक गॅलरीपुरते मर्यादित राहतील. याउलट जनतेने यंदा भाजपला ३७० हून अधिक आणि एनडीएला ४०० हून अधिक जागा देण्याचा निर्धार केला आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या भाषणात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर तोंडसुख घेतले. माजी पंतप्रधान नेहरूंनी देशाला आळशी संबोधून देशवासीयांचा अपमान केला होता, असा आरोप केला. या देशाला कष्ट करण्याची सवय नाही. युरोप, जपान, चीन, रशिया, अमेरिका हे देश कष्ट करतात असे नेहरू म्हणाल्याचा दाखला मोदींनी दिला. विद्यमान लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे, त्यामुळे मोदींचे हे संसदेतील शेवटचे भाषण होते.

अर्थातच निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ते भाषण करणार हे उघड होते. मात्र या भाषणातील एक बाब विशेष खटकणारी होती ती म्हणजे नेहरूंवरील टीका. मोदींच्या बहुतेक भाषणात नेहरूंवर ओरखडे असतातच. या वेळची टीका मात्र अत्यंत सवंग स्वरूपाची होती. म्हणे नेहरूंनी भारतीयांना आळशी संबोधून त्यांचा अवमान केला. त्यावेळी प्रत्यक्षात नेहरू काय म्हणाले होते याचा दाखलाही मोदींनी दिला. नेहरू म्हणाले होते, ‘भारतातील लोक जादूने श्रीमंत होणार नाहीत, त्यांना खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. युरोपियन, जपानी, चिनी, रशियन, अमेरिकी लोक जितके कष्ट करतात तितके आपण करीत नाही.’ हे देश जादूने श्रीमंत झाले नाहीत, मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरच ते सुखी झाले असे नेहरू म्हणाले होते. नेहरूंनी वस्तुस्थिती मांडली होती, यात भारतीयांना आळशी ठरवण्याचा विचार कुठे येतो? सद्सद्विवेकबुद्धीने विचार केला तर नेहरूंच्या या वक्तव्यात काय चूक होती? सर्वांनी देश उभारणीच्या कार्यात जोमाने साथ देऊन अधिक कष्ट करावेत, असे आवाहन एखाद्या पंतप्रधानांनी करण्यातही तुम्हाला जर काही गैर वाटत असेल तर तो तुमच्या दृष्टिकोनातील दोष म्हणावा लागेल. आज तुम्हीही देशाला उद्देशून आवाहन करता ना? मग ते गैरलागू म्हणायचे का? ‘आराम हराम है’ ही नेहरूंची लोकप्रिय घोषणा होती.

स्वत: नेहरूंनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले होते, तुरुंगवास भोगला होता आणि आधुनिक भारताचा पाया रचला होता. नेहरूंना जाऊन सहा दशके उलटली तरीही आज त्यांचे नाव घेतल्याशिवाय मोदींचे एकही भाषण पूर्ण होत नाही. नेहरूंनी स्वातंत्र्य चळवळीत दहा वर्षे तुरुंंगवास भोगला होता. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाला विज्ञान, संशोधन व तंत्रज्ञानाची दिशा दाखवली. अनेक शासकीय, प्रशासकीय व औद्योगिक संस्था उभारल्या. शून्यातून देशाची उभारणी केली, म्हणूनच जग नेहरूंना ‘नवभारताचे शिल्पकार’ म्हणून ओळखते. त्यांनी रचलेल्या पायामुळेच आज १०४ कृत्रिम उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा जागतिक विक्रम भारताच्या नावे लागला आहे. नेहरूंमुळेच देशाला अल्पावधीत आंतरराष्ट्रीय राजकारणात मानाचे स्थान प्राप्त झाले. त्यांच्या पुण्याईवरच तुम्ही जगत आहात. ते सारे विसरून तुम्ही आज काय करीत आहात? नेहरूंनी निर्माण केलेले अनेक सार्वजनिक उद्योग, औद्योगिक संस्था आपल्या मर्जीतील उद्योगपतींच्या घशात घालण्याचे ‘सत्कार्य’ करीत आहात.

या उद्योगांचे, संस्थांचे खाजगीकरण करून रोजगाराची सर्व साधने, संधी नष्ट करीत आहात. त्यामुळे बेरोजगारीचा गत पाच दशकांतील उच्चांक आज निर्माण झाला आहे. ८२ कोटी जनतेला मोफत धान्य पुरवतो अशी दर्पोक्ती मिरवता आणि भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल अशी टिमकी वाजवता हे कसे काय? मोफत धान्य पुरवठा ही ‘मोदींची गॅरेंटी’ आहे म्हणे! ही रोजगार हमी नव्हे तर ‘बेरोजगार हमी योजना’च म्हणावी लागेल. आज इतक्या वर्षांनंतरही काहीही अनुमान काढून नेहरूंंवर आगपाखड करणे हा मोदींच्या भाषणातील आणि विचारातील ‘विक पॉईंट’ म्हणावा लागेल. खुद्द मोदींनीही आजवर अनेक आवाहने केली आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मेहनत करून अभ्यास करण्याचे, परीक्षा देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाचे त्यांच्या शैलीतच अनुमान काढायचे झाल्यास, मोदींना भारतीय विद्यार्थी आळशी आहेत, ते अभ्यास करीत नाहीत, मेहनत घेण्याची त्यांची तयारी नाही असा अर्थ काढायचा का? असे वक्तव्य करून मोदींनी भारतीय विद्यार्थ्यांचा अवमान केला असा निष्कर्ष काढायचा का? मुळात मोदींनी अथवा संघ परिवाराने कायम नेहरूंचा पाणउतारा करण्यातच धन्यता मानली.

नेहरूंनी आपल्या कार्यकाळात किती काम केले याचा चिकित्सकपणे अभ्यास केल्यास थक्क होण्याची वेळ येईल. मुघलांनी सहाशे वर्षे आणि ब्रिटिशांनी दीडशे वर्षे लुटलेला आणि सर्व बाजूंनी जर्जर झालेला देश नेहरूंच्या हातात आला होता. परंतु नेहरूंनी आपल्या कार्यकाळात एकदाही मागच्या राजवटीवर खापर न फोडता वेगाने देश उभारणीचे काम हाती घेतले. त्यांच्यासमोर असंख्य आव्हाने होती. देशात सर्वांना समान सूत्रात बांधणारी घटना तयार करण्याचे आव्हान होते. भारतीय संसदेची रचना तयार नव्हती. ही सारी मूलभूत कामे करून लोकांच्या कल्याणासाठीचे कार्यक्रम हाती घ्यावे लागणार होते. रोगराई, निरक्षरता हे प्रश्नही होते. देश केवळ शेतीवरच अवलंबून होता, औद्योगीकरणाला सुरुवात व्हायची होती. या सा-या आव्हानांचा सामना करत नेहरूंनी देशाला वेगाने पुढे नेले. त्यांचे हे कार्य त्यांचे समकालीन विरोधकही मान्य करत होते. पण आज नेहरूंच्या विरोधाची कावीळ झालेल्यांना ते मान्य नाही! जावईशोधाचा खटाटोप करण्यापेक्षा मोदींनी आपल्या कार्यकाळात देश ख-या अर्थाने किती बदलला याचा प्रामाणिकपणे धांडोळा घ्यावा, अर्थात प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR